ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या ज्ञान मंदिरात शिक्षकाच्या रंगेल वृत्तीची झळ एका विद्यार्थिनीला बसली असून अश्लिल चिठ्ठी आणि असभ्य वर्तन यामुळे तिला मानसिक धक्का सहन करावा लागला. कॅनडा कॉर्नर परिसरातील रचना विद्यालयात हा प्रकार घडला. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसह ते जाब विचारायला गेले असता व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.
शरणपूर रस्त्यालगतच्या रचना विद्यालयात माध्यमिक विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसमवेत हा प्रकार घडला. गणित विषय शिकवणारे राजेंद्र सोनणीस यांनी एका विद्यार्थीनीला ही चिठ्ठी लिहिल्याचा आरोप आहे. मुलींशी सलगी करून वागताना सोनणीस यांनी महिनाभरापूर्वी हे पत्र लिहिले होते. त्यात तिची वर्गातील वर्तवणूक, तिने कसे वागु नये, तिची केशरचना यासह अभ्यास कसा करावा, तिचे गणित विषयातील गुण वाढविण्यासाठी काय करावे लागले, तिच्यावर असलेली मेहरनजरसह अभ्यासात काही अडचण आल्यास आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा अशी सूचना आदींचा अंतर्भाव आहे. यानंतरही असाच काही आशय असलेले आणखी एक पत्र दिले. शाळा सुटतांना मला भेटून जात जा, अशी अप्रत्यक्ष सूचना करत पालक किंवा मैत्रीणींना पत्राबद्दल काही न सांगता ते फाडून टाकण्याचा सल्ला देण्यात आल्याचे पालक व विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
शिक्षकांच्या वर्तनाचा संबंधित विद्यार्थीनीला मानसिक धक्का बसला. तिचे जेवण आणि अभ्यासावरील उडालेले लक्ष, खालावत चाललेली प्रकृती यामुळे पालकांनी विचारणा केली असता हा प्रकार लक्षात आला. शुक्रवारी पालकांनी शाळेत धाव घेऊन मुख्याध्यापकांकडे पत्र देऊन विचारणा केली. त्यांनी त्यात काही आक्षेपार्ह नसल्याची भूमिका घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. पालक तसेच विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे व्यवस्थापनाने नमते घेत संशयित सोनणीसला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, या काळात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली असली तरी वर्ग नियमितपणे सुरळीत होते. संशयित शिक्षक आधी नवरचना विद्यालयात कार्यरत होता. त्या ठिकाणी काही तक्रारी झाल्यामुळे त्याची रचना विद्यालयात बदली करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
शिक्षकाची विद्यार्थिनीला चिठ्ठी
शिक्षकांच्या वर्तनाचा संबंधित विद्यार्थीनीला मानसिक धक्का बसला.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 10-10-2015 at 01:11 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher write letter to student