scorecardresearch

शिक्षकांवर ‘फाळणी दिना’चे नवे ओझे ; नाशिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश; रविवारी शाळांमध्ये विविध उपक्रम

या कार्यक्रमासाठी शिक्षकांना शाळेतील फळय़ांवर फाळणी शोकांतिका स्मृतीदिन असे नमूद करावयाचे आहे.

शिक्षकांवर ‘फाळणी दिना’चे नवे ओझे ; नाशिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश; रविवारी शाळांमध्ये विविध उपक्रम
(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी विविध कार्यात सहभागी असलेल्या शिक्षकांच्या कामांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. केंद्र सरकार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषीका (फाळणी) शोकांतिका स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर रविवारी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यापासून ते विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे.

या कार्यक्रमासाठी शिक्षकांना शाळेतील फळय़ांवर फाळणी शोकांतिका स्मृतीदिन असे नमूद करावयाचे आहे.

शिवाय विद्यार्थ्यांसमोर या विषयावर प्राप्त झालेल्या भल्यामोठय़ा चित्रफितीसह सादरीकरणही करावे लागणार आहे.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. म. वा.कदम यांनी जिल्ह्यातील समस्त शाळेत १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषीका स्मृती दिन (फाळणी शोकांतिका स्मृती दिवस) म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले.

शिक्षण विभागाने ध्वनिचित्रफित नाशिक आणि मालेगाव शिक्षण मंडळ, गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविली आहे. यानिमित्त शाळांमध्ये दृकश्राव्य माध्यमातून माहिती सादर केली जाणार आहे. बैठकीत पीपीटी स्वरुपातील या माहितीचे फलक बनवून रेल्वे, मॉल, बँका आदी ठिकाणी प्रदर्शन आयोजनाचा विषय चर्चेला आला होता, असे एका शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गुरुजी धास्तावले..

या उपक्रमाने शिक्षक वर्ग धास्तावला आहे. भलीमोठी पीपीटी डाऊनलोड करताना त्यांची दमछाक होत आहे. सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये प्रभात फेरी, निबंध, रांगोळी, वक्तृत्व, समूह नृत्य, समूह गायन, चित्रकला स्पर्धा असे उपक्रम राबविले जात आहेत. शिवाय, स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना शिक्षक वर्ग पूर्णत: व्यग्र असताना आता रविवार या सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे बंधनकारक करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

सूचना काय? या कार्यक्रमावेळी प्रारंभी ज्येष्ठ नागरिक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करावे. उद्घाटन सोहळय़ात देशभक्तीपर गीते वाजवावीत. फाळणीची शोकांतिका सहन केलेल्या व्यक्तींना निमंत्रित करावे. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करावी. १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्य हेतू.. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू फाळणीच्या शोकांतिकेवर प्रकाश टाकण्याचा आहे. त्यामुळे कार्यक्रम साजरा करताना कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास शाळांना सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teachers involved in har ghar tiranga campaign get another addition work zws