नाशिक : राज्य शासनाच्या सुचनेनुसार यंदा वार्षिक परीक्षा झाल्यानंतरही ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. परीक्षा झाल्यावर विद्यार्थी कितपत शाळेत येतील, याविषयी शंका असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे, यासाठी शाळास्तरावर वेगवेगळय़ा उपक्रमांची आखणी करण्यात येत आहे. शाळा स्तरावर पालक, विद्यार्थी यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे.

दोन वर्षांच्या करोनामुळे मिळालेल्या प्रदीर्घ विश्रांतीत सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे झाले. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शिक्षकांसाठी एक आव्हान होते, ते त्यांनी यशस्वी पेलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अजून वाढावा, अभ्यासाची गोडी लागावी म्हणून येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ (द्वारा रचना विद्यालय) या संस्थेने राष्ट्र सेवा दल नाशिक शाखा यांच्या सहकार्याने परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी १९ ते २४ एप्रिल या कालावधीत ‘थोडी मस्ती थोडा अभ्यास’ या उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उदघाटन संस्था अध्यक्ष सुधाकर साळी यांचे अध्यक्षतेखाली आणि शिक्षणाधिकारी (नंदुरबार) मिच्छद्र कदम यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शिबिरात व्यंगचित्र काढणे, नृत्य, पथनाटय़, संगीतातून-गीतांकडे, खेळांतून इंग्रजी, प्रात्यक्षिकांतून  गणित-भूमिती, मनोरंजनातून भाषा विकास, विविध खेळ, लेझीम, झांज इत्यादीचे प्रात्यक्षिकातून अभ्यास तसेच प्रसिद्ध वक्ते गौरी पटवर्धन(स्त्री-पुरुष समानता), संदीप भावसार (भारतीय संविधान), डॉ.निनाद चोपडे( प्रथमोपचार), पुष्पा चोपडे (आरोग्यभान), महेंद्र दातरंगे(अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोग), अनिल माळी(नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षी व त्यांचे अधिवास) या मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे. नाशिकच्या प्रसिद्ध सुगम संगीतकार तथा कीर्तनकार निर्मला अष्टपुत्रे यांचे संगीत मार्गदर्शन लाभणार आहे.  नि:शुल्क असलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरू गोबिंद सिंग पब्लिक स्कुलच्या वतीने उन्हाळी सुट्टीच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरू आहे. लता मंगेशकर यांच्या हिंदी- मराठी गीतांवर विद्यार्थ्यांचे नृत्य, समुह गीत सराव सुरू आहे. मध्यवर्ती शैक्षणिक संस्थेच्या वतीने शाळा परिसरात आभासी शिक्षण सुरू असताना मुलांना ज्या संकल्पना समजल्या नाहीत त्याचा सराव सुरू आहे. यासह अन्य शाळांमध्ये छंद वर्ग भरविण्यात आले आहेत. यामध्ये कागदकाम, रंगकाम, क्रीडा स्पर्धा आदींचा समावेश आहे. मात्र पालकांकडून काही वेळा विरोध होत आहे. अध्यापन नसताना विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळय़ा कामात मैदानावर गुंतवले जात आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा पाहता पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी नाराजी व्यक्त करण्यात आली. केवळ शासकीय आदेशाची परिपूर्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येत आहे. एक मेच्या निकालाची तयारी करायची की विद्यार्थ्यांना उपक्रमांत मार्गदर्शन करायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.