छात्रभारतीचे शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन; शुल्काबाबत विद्यार्थी जाब विचारणार
शहरातील महाविद्यालयांनी शासकीय नियम धाब्यावर बसवित केलेली शुल्क आकारणी परत करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिक्षण उपसंचालकांशी झालेल्या चर्चेत १ फेब्रवारी रोजी प्राचार्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी छात्रभारती प्राचार्याना जाब विचारेल, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
शहर व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांत शासकीय नियम बाजूला ठेवत मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर शुल्क आकारले गेले. याबाबत तीन वर्षांपासून छात्रभारती पाठपुरावा करीत आहे. चांदवड येथे झालेल्या प्राचार्याच्या बैठकीत शिक्षण उपसंचालकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. बेकायदेशीर शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी स्वरूपात कारवाई केली जाईल, असे जाहीर केले गेले. तरीदेखील सर्व महाविद्यालयांमध्ये आजही बेकायदेशीरपणे शुल्क घेतले जात आहे. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात याच मुद्दय़ावर छात्रभारतीने आंदोलन केले होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाने बेकायदेशीररीत्या शुल्क आकारल्याचे मान्य केले. मात्र संस्था अडचणींवर मात करून काम करीत असल्याचे सांगत संस्थेची बाजू घेतली. यानंतर संघटनेने वेळोवेळी आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. मात्र त्याबाबत ठोस कारवाई, शुल्क परतावा न झाल्यामुळे सोमवारी छात्रभारतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिक रोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात धडक दिली. शिक्षण उपसंचालक कार्यालयात नसल्याने आंदोलकांनी त्यांच्या दालनात रिकाम्या खर्चीसमोर ठिय्या दिला. काही वेळानंतर त्यांच्या कार्यालयात आगमन झाले. शिक्षण उपसंचालकांना आंदोलकांनी घेराव घालत आपल्या मागण्या मांडल्या. सूर्यवंशी यांनी १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व प्राचार्याची शुल्क परतावा, या विषयावर बैठक बोलावण्यात आल्याचे सांगितले. त्यात या मुद्दय़ावर अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे. यावर अंतिम निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला. शिक्षणमंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडला जाईल. तसेच शासकीय अधिकारी व संस्थाचालकांची हातमिळवणी कशी आहे, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटना करणार आहे. या वेळी राकेश पवार, सागर निकम, विशाल रणमाळे, सचिन भुसारे आदी उपस्थित होते.