या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी मध्यरात्री पंचवटी परिसरात वाहनधारकाची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना काही तासांतच अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत एकाला जखमी करून संशयित फरार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील किशोर रूपचंद पाटील व त्यांचा मुलगा गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका आप्तेष्टाला रुग्णालयात भेटून घराकडे परतत होते. काटय़ा मारुती परिसरात लाल रंगाच्या पल्सरवरील दोघा संशयितांनी त्यांना आवाज दिला. यामुळे पाटील थांबले असता संशयितांनी त्यांच्याकडील २५०० रुपयांची रोकड व खिशातील भ्रमणध्वनी असा एकूण आठ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. अचानक घडलेल्या घटनेमुळे भेदरलेल्या पाटील यांनी समयसूचकता दाखवत पल्सरचा क्रमांक नोंदवून घेतला आणि पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लगेचच नाकाबंदी केली. साधारणत: तीन ते चार तासांत निमाणी बस स्थानक परिसरात या संशयितांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. पल्सरसह मुकेश मोरे (२०) आणि पंकज आघाव यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अशीच घटना मखमलाबाद रस्त्यावर घडली. सायकलवरून घरी परतत असताना गणेश झिरवाळ यांना पाटानजीक दुचाकीवर आलेल्या तिघांनी अडवले. तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. पैसे नाही असे सांगितल्यावर झाडाझडती घेत त्यांच्या पोटावर वार करून संशयितांनी पलायन केले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य काहींनी पंचवटी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमी झिरवाळ यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft in panchavati two criminal arrested
First published on: 26-12-2015 at 02:43 IST