करोनामुळे वनविभागाचा निर्णय
नाशिक : यंदा पावसाचा विशेष जोर नसला तरी हलक्या सरींनी परिसर हिरवळीने सजला आहे. त्र्यंबकेश्वर आणि पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने निसर्ग दररोज
आपले रुप बदलू लागला आहे. निसर्गाच्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी करोना संसर्गाची पर्वा न करता पर्यटक मोठय़ा प्रमाणावर त्र्यंबके श्वर परिसरात गर्दी करू लागल्याने वन विभागाने स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांच्या साहाय्याने अंजनेरीसह दुगारवाडी धबधब, हरिहर गडाकडे जाणारे रस्ते बंद के ले आहेत.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर त्र्यंबके श्वर परिसरातील निसर्ग विलक्षण सौंदर्य पांघरतो. निसर्गाचे हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. नाशिकच्या पश्चिम भागासह सह्यद्रीतील अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, दुगारवाडीचा धबधबा, पोहणे आणि अंबोलीतील सृष्टी सौंदर्य, धबधबे, वाघेरा, घाट, अंबा धबधबा आदी ठिकाणे पर्यटकांना भुरळ पाडतात. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची कमालीची गर्दी होते. यंदा करोना संसर्गाचे संकट असतानाही पर्यटक जीवाची पर्वा न करता या ठिकाणी गर्दी करु लागले. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नाशिक उपवनसंरक्षक कार्यालयाने कंबर कसली आहे.
अंजनेरी या गडकोटावर वर्षभर रोजच गर्दी असते. त्यास प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी अतिशय चोख भूमिका बजावली आहे. पर्यटकांना या परिसरात मज्जाव केला असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी के ली जाते. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गर्दीवर चांगलाच लगाम बसला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातर्फे हरिहर किल्ला आणि दुगारवाडीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. फक्त स्थानिकांनाच या ठिकाणी प्रवेश व रस्ता खुला केला जातो.
याविषयी अंजनेरी येथील वनसंरक्षक सुजित बोकड यांनी भूमिका मांडली. वनविभाग आणि ग्रामस्थ अंजनेरी यांच्या सूचनेनुसार आम्ही अंजनेरी तसेच परिसरात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव केला आहे. अनोळखी तसेच इतर व्यक्तींची विचारपूस के ली जाते. अंजनेरी गडावर जाण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली असून पथदर्शी रस्त्यावर सूचना फलक लावल्याने पर्यटकांची गर्दी कमी झालेली आहे. सापगाव येथील पोलीस पाटील पंढरीनाथ दिवे यांनीही उपाययोजनांची माहिती दिली.
हरिहर किल्ला आणि दुगारवाडीचा धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात कमालीची गर्दी होत असते. यंदा त्र्यंबकेश्वर पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेऊन आहेत. कडेकोट पहारा ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.