नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांसह पर्यटकांच्या संख्येतही वाढ

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडी परतल्याने विदेशी पक्ष्यांची संख्या वाढली आहेच, पण करोना निर्बंध शिथिल झाल्याने अभयारण्यास भेट देणाऱ्या पक्षीप्रेमींच्या संख्येतही वाढ झाली आहे.

२७ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद, दीड हजारांहून अधिक पर्यटकांची भेट 

नाशिक : जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडी परतल्याने विदेशी पक्ष्यांची संख्या वाढली आहेच, पण करोना निर्बंध शिथिल झाल्याने अभयारण्यास भेट देणाऱ्या पक्षीप्रेमींच्या संख्येतही वाढ झाली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी आतापर्यंत मागील काही दिवसांत दीड हजाराहून अधिक पक्षीप्रेमींनी हजेरी लावली. हिवाळा सुरू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच परिसरातून थंडी गायब झाली होती. परंतु मागील आठवडय़ापासून थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पक्षी मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत. पक्षीतीर्थ असलेल्या अभयारण्य परिसरात सध्या २७ हजारांहून अधिक पक्षी मुक्कामास असून पुढील काळात ही संख्या वाढेल, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी करीत आहेत.

अभयारण्य परिसरात हंगामातील तिसरी पक्षी गणना नुकतीच करण्यात आली. पक्षी गणनेत वन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मार्गदर्शक, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक सहभागी झाले होते. अभयारण्य परिसरातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वर, गोदावरी नदीपात्र, कोठुर, कुरूडगाव, काथरगांव या सात ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. गणनेत विविध पाणपक्षी, झाडांवरील गवताळ भागातील पक्षी दिसून आले. २५ हजार ६२४ पाणपक्षी आणि दोन हजार १८६ झाडांवरील तसेच गवताळ भागातील पक्षी याप्रमाणे २७ हजार ८१० पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

विदेशी पक्ष्यांना अभ्यासण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी अभयारण्य परिसरात पक्षीप्रेमी भेट देऊ लागले आहेत. करोना निर्बंध शिथिल झाल्याने पक्षीप्रेमींच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक पक्षीप्रेमींनी हजेरी लावली आहे. पर्यटकांना सुविधा दिल्यास त्यांची संख्या अधिक वाढू शकते, हे लक्षात आल्याने पक्षी निरीक्षण केंद्र तसेच दुर्बीण उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक मार्गदर्शकाकडून पक्ष्यांविषयी माहिती देण्यात येत असल्याचे वनक्षेत्रपाल शेखर देवकर यांनी सांगितले.

विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांमध्ये प्लेमिंगो, ऑस्प्रे, कॉमन क्रेन, नॉर्यन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन, व्हिजन, गडवाल, रुडी, शेल डक, मार्श हरियर, मॉन्टेग्यु हरियर, ब्लु थ्रोड, गोल्डन फ्लॉवर यांचा समावेश आहे. स्थानिक पक्ष्यांमध्ये उघडय़ा चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, रिव्हिर टर्न, प्रन्टिकोल, कमळपक्षी, शेकाटय़ा आदी पक्षी आढळले. यापैकी काही स्थानिक पक्षी कायमच अभयारण्य परिसरात आढळून येत असतात. थंडीचे प्रमाण जसे वाढेल तसे वेगवेगळय़ा ठिकाणांहून स्थलांतरित होऊन येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढत जाईल, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tourists birds nandur madhmeshwar sanctuary ysh