घरच्या आणि आपल्या माणसांमध्ये जाण्याच्या ओढीने मुंबई, वाशिम, पालघरसह इतर भागातून परप्रांतीय मजूर, कामगारांचे मिळेल त्या वाहनाने तसेच पायी जाणे शनिवारीही सुरूच राहिले. मोठय़ा प्रमाणावर लोक बाहेर पडल्याने कसारा घाटासह जिल्ह्यातील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. एकिकडे पायी प्रवास करणारे आणि दुसरीकडे वाहनांची रांग असे दृश्य दिसले. ठिकठिकाणी स्थानिकांकडून पायी जाणाऱ्यांसाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
टाळेबंदीमुळे परप्रांतीय मजूर, कामगार हाताला काम नसल्याने आपल्या गावाकडे निघाले आहेत. नोंदणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही मूळ गावी जाण्यासाठी त्वरीत व्यवस्था होत नसल्याने अगतिक झालेल्या परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे महामार्गाने पायीच गावाकडे जात आहेत. काही जण रस्त्याने जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला हात देवून जर वाहन थांबलेच तर रवाना होत आहेत. अन्यथा पायीच जात आहेत.
शनिवारी तर गर्दीत अधिक वाढ झाली. पहाटेपासून कसारा घाटमार्गे रिक्षा, मिनी बस तसेच मालवाहतूक वाहनांनी आणि पायी मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीय मुंबई-आग्रा महामार्गाने पुढे जात होते. शारीरिक अंतरपथ्याची पर्वा न करता प्रत्येक वाहनात क्षमतेपेक्षा अधिक लोक भरण्यात आले होते. कसारा घाट, घोटी टोल नाका, गोंदे या ठिकाणी यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. उन्हापासून वाचण्यासाठी काहींनी मालवाहतूक वाहनावरील ताडपत्री डोक्यावर घेतली. तर काहींनी लोंबकळत प्रवास सुरू ठेवला. तळवे सुजलेले, गुडघे दुखत असतांनाही अनेक जण पायीच जात होते. उन्हात काही वेळ एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमाने ते वाट चालत होते. त्या त्या भागातील स्थानिकांकडून माणुसकीच्या नात्याने स्थलांतरीतांना जेवण तसेच पाणी देण्यात येत होते.
मोठय़ा प्रमाणावर शहरात दाखल होणारे लोंढे थांबविण्याचा पोलिसांनी केविलवाणी प्रयत्न केला. काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गर्दी शहरात येऊ नये यासाठी महामार्ग, मुख्य मार्ग रस्त्याने गर्दीला पुढे पाठविण्यात आले. पायी चालणाऱ्यांना थांबवित वाहनात बसविण्यात आले.
इगतपुरीत मालेगावच्या फळ विक्रेत्यांना बंदी
इगतपुरी तालुक्यात करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी तालुका वगळता बाहेरगावचे भाजी विक्रेते तसेच मालेगावच्या फळ विक्रेत्यांना शहरात विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय तहसीलदार अर्चना पागेरे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, पोलीस निरीक्षक रत्नपारखी, संजय इंदुलकर, प्रभारी नगराध्यक्ष नईम खान आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय हॉटेल वगळता इतर सर्व दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत उघडी ठेवणे, आठवडय़ातून मंगळवार, गुरूवार आणि रविवार हे तीन दिवस औषधालय वगळता सर्व दुकाने बंद ठेवणे, इगतपुरीच्या सर्व सीमा परत अडथळे लावून बंद करणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत.