रस्ता सुरक्षा पंधरवडय़ात वाहनधारकांमध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंगळवारी शहरातील सर्व सिग्नलवर सकाळी आठ ते दुपारी एक या कालावधीत वाहतुकीचे नियमन करण्याचे काम तब्बल एक हजार शालेय विद्यार्थी करणार आहेत. वाहतूक नियमांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी अनोखे उद्यान साकारणाऱ्या नाशिक फर्स्ट संस्थेने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. याबाबतची माहिती नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते होणार आहे. पंधरवडय़ात रस्ता सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. रस्ते अपघातात दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. या पाश्र्वभूमीवर वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. नाशिक फर्स्टने उभारलेल्या चिल्ड्रेन टॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेविषयी प्रशिक्षित केले जात आहे. आतापर्यंत त्या अंतर्गत सुमारे ३२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून इयत्ता आठवी व नववीच्या एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील ३४ पैकी ३१ सिग्नलची अभियानासाठी निवड करण्यात आली. सकाळी आठ ते दुपारी एक या कालावधीत प्रत्येक सिग्नलवर ३० यानुसार विद्यार्थी वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या समवेत संस्थेचे २०० सदस्य, ५० वाहतूक पोलीस व सहभागी शाळांचे ५० शिक्षक साहाय्यकाच्या भूमिकेत राहणार आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होत असते. तथापि, १०० रुपये दंड भरून वाहनचालकाच्या मानसिकतेत बदल होईल याची शाश्वती नसते. ही मानसिकता बदलविण्यासाठी विद्यार्थी नियमांचे पालन करण्याचा आग्रह वाहनचालकांकडे धरणार आहे. वाहनधारकांनी सीटबेल्ट, हेल्मेट वापरणे आणि वाहतूक नियमांविषयी जागृती, अपघात टाळण्यासाठी वाहनांची वेगमर्यादा, सुरक्षित अंतर यासारखे नियम पाळण्यासाठी विद्यार्थी जनजागृती करतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली असून, त्यासाठी त्यांचा एक दिवसीय विमा उतरविण्यात आला आहे.