नाशिक : सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मट सक्तीसाठी आग्रही असणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची बदली होताच शहर परिसरात हेल्मेट सक्तीची मोहीम थंडावली आहे. पोलीस आयुक्तालयाने हेल्मेट सक्तीसाठी दिलेले नियम धाब्यावर बसवत दुचाकी चालक फिरत आहेत. शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालकांची संख्या पुन्हा वाढली असून पंपांवरही हेल्मेट नसले तरी पेट्रोल दिले जाऊ लागले आहे.
रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण, यामध्ये होणारी जीवितहानी लक्षात घेता तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती केली. त्याकरिता ऑगस्टपासून नो हेल्मेट- नो पेट्रोल ही मोहीम राबवली. यासाठी पेट्रोल पंपावर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. प्रारंभी दंडात्मकपेक्षा प्रबोधनावर भर देताना शहरातील पाथर्डी फाटा, मुंबई नाका यासह अन्य ठिकाणी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले. ४० हजारांहून अधिक वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र वाहनचालकांचा आडमुठेपणा पाहता वाहन परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. ही कारवाई तीव्र करताना विनाहेल्मेट असलेल्या वाहनचालकाला पेट्रोल दिल्यानंतर अपघात झाल्यास पेट्रोल पंपचालकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यास पंप चालकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हा निर्णय बारगळला. दरम्यान, शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये, विद्यालय- महाविद्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट प्रवेश दिला म्हणून काही प्राचार्यावर गुन्हेही दाखल झाले.
पाण्डेय यांची हेल्मेटसक्तीविषयीची भूमिका पाहता वाद होत असले तरी नाशिक पोलीस हेल्मेट सक्तीसाठी आग्रही राहिले. यासाठी शहर परिसरात वेगवेगळय़ा ठिकाणी मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र पाण्डेय यांची बदली होताच शहर परिसरात ही मोहीम थंडावल्याचे चित्र आहे. वाहनचालक हेल्मेट डोक्यात घालण्याऐवजी दुचाकीच्या आरशाला अडकवून फिरत आहेत. बऱ्याच पंपांवर विनाहेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल दिले जात आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू असल्याचा दावा केला आहे.
मोहीम सुरूच
शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम सुरूच असून वेगवेगळय़ा ठिकाणी कारवाई होत आहे. आतापर्यंत ६० हजारांहून अधिक वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले असून ४७ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमित कारवाई सुरू असून समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून प्रबोधन होत आहे.– संजय गायकवाड (उपायुक्त, वाहतूक पोलीस)