भाजप आयोजित मोहिमेत विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग, तीन हजार रोपांची लागवड

नाशिक : भाजपने हाती घेतलेल्या नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी  वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत तीन हजार झाडे लावण्यात आली. नंदिनी (नासर्डी)च्या उगमस्थानापासून शहरातून ज्या भागातून ती मार्गस्थ होते, तिथे काठावर रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात विविध सामाजिक, पर्यावरणवादी संस्थामधील शेकडो महिलांना आवर्जुन सहभागी करून घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या वतीने नंदिनी नदीला प्रदूषणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत मध्यंतरी स्वच्छता मोहीम राबविली गेली होती. वटपौर्णिमेचे औचित्य साधून तीन हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.

भाजपमधील पर्यावरणप्रेमी महिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला. नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी  येथील संगमस्थानापर्यंत दोन्ही काठावर ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महिला नगरसेविका व पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

पर्यावरणस्नेही वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी हिरव्या रंगाचा पोषाख परिधान करून वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. याकरीता नदी काठावर आधीच खड्डे खोदून मोफत रोपेही उपलब्ध करून देण्यात आली होती.

या उपक्रमातून पक्षाशी थेट संबंधित नसलेल्या महिलांशी जनसंपर्क साधण्यात भाजपचे स्थानिक नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार यशस्वी झाले. महापालिका निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेशी संपर्क साधण्याची धडपड करीत आहे. भाजपने या उपक्रमातून संपर्क वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळाले.

आगामी महापालिका निवडणुकीशी भाजपच्या वृक्षारोपण मोहिमेचा कुठलाही संबंध नाही. प्रदेश भाजपकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम देण्यात आला. त्यानुसार ही मोहीम पार पडली. जागतिक पर्यावरण दिनी भाजपने नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियान हाती घेतले आहे. त्यात वटपौर्णिमेच्या दिवशी नदी काठावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला गेला. पुढील काळात प्लास्टिकमुक्ती अभियानही राबविले जाणार आहे. वृक्षारोपण मोहिमेत तीन हजार महिलांना निमंत्रित करण्यात आले. तेवढीच रोपे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

– सीमा हिरे (आमदार, भाजप)

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree planting campaign under nandini river conservation campaign ssh
First published on: 25-06-2021 at 02:12 IST