स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी शस्त्र आणि शब्द यातून क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. राष्ट्र उभारणीत दोघांचे अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी केले.

येथे दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित वसंत व्याख्यानमालेत अ‍ॅड. शौचे यांनी २८ वे पुष्प गुंफले. शौचे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.

सधन कुटुंबात जन्माला येऊनही नेताजींनी स्वतंत्र भारताचा ध्यास घेतला. ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी इंग्रजांच्या छातीत धडकी भरवली. संघर्ष, त्याग, यातून नेताजींनी देश स्वतंत्र कसा होईल यासाठी आयुष्य पणाला लावले. ‘द इंडियन स्ट्रगल‘ आणि ‘इंडियन पीलग्रीम‘ या पुस्तकातून जहाल विचारांची पेरणी करतांना नेताजींनी प्रस्थापितांशीही संघर्ष के ला. भारत स्वतंत्र व्हावा हा एकमेव उद्देश नेताजींसमोर होता. नेताजी आणि सावरकर यांचे विचार वेगळे असले तरी ध्येय मात्र ब्रिटिशांपासूनच्या देशमुक्तीचे होते. प्रसंगी बलिदान देण्याची भावना त्यांच्यात होती, असे अ‍ॅड. शौचे म्हणाले.

महात्मा गांधींनी १९२२ साली केलेल्या असहकार आंदोलनास सुभाषबाबूंचा विरोध होता. स्वराज्य पार्टीची स्थापना करून त्यांनी राजकीय कामाला सुरुवात केली. सायमन कमिशनलाही त्यांचा विरोध होता.आझाद हिंद सेनेची स्थापना करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला, तेव्हां क्षेत्रहिन सरकार म्हणून जपानने आझाद हिंद सेनेला मान्यता देऊन त्यांना अंदमान, निकोबार बेटे देऊ केली होती, असेही त्यांनी सांगितले.

ने मजसी ने,परत मातृभूमीला या बायडनच्या किनाऱ्यावर सुचलेल्या काव्यपंक्तीतून सावरकरांना भारतमातेची ओढ किती तीव्र होती, याची जाणीव होते. त्यांच्या साहित्याला उंची आणि तितकीच खोलीही आहे. सावरकरांच्या ८३ वर्षांच्या आयुष्याचा आलेख बघितल्यास देशावर अतोनात प्रेम करणाऱ्या या वीरास शेवटी त्रास, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तेजस्वी वाणी, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, प्रखर लिखाण यातून क्रांतिकारक,देशभक्त जन्माला येतो. जातीभेद, अस्पृश्य निवारण, यासाठी सावरकरांनी कोकणात पतितपावन मंदिराची स्थापना करून आचार—विचारांचे एकत्रीकरण केले. क्रांतिकारकांनी स्वत:चा विचार केला असता तर भारत स्वतंत्र झाला नसता. लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे म्हणून आपण सुखी असल्याचेही अ‍ॅड. शौचे म्हणाले.