२० लाखांच्या खंडणीसाठी मालेगाव येथील व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात त्याच्याच दोन मित्रांचा हात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे दोघे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. या दोघांना रविवारी गुन्हे शाखेने अटक केली.
शहरातील केटीएचएम महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात मोहित बाविस्कर हा शिकत होता. मालेगाव येथील व्यावसायिक प्रलिन बाविस्कर यांचा तो मुलगा. मोहितचे अपहरण करून त्याच्याच भ्रमणध्वनीवरून २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी त्याच्या वडिलांकडे करण्यात आली होती. पोलीस या संदर्भात तपास करीत असतानाच शनिवारी मोहितचा मृतदेह त्र्यंबकजवळील सापगाव शिवारात आढळून आला. या प्रकरणात तक्रार दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी गंभीरपूर्वक हे प्रकरण हाताळले असते तर मोहितचा जीव वाचला असता, असा आरोप झाला. गुन्हे शाखेने हत्येनंतर ४८ तासांच्या आत या प्रकरणाचा तिढा सोडवत मोहितच्या दोन मित्रांना अटक केली. पैशाच्या मोहातून मूळचा ठाण्याचा खुशाल ऊर्फ आकाश प्रभू (१८ वर्षे) आणि मालेगावचा सौरभ चौधरी (१७ वर्षे) यांनी मोहितचे अपहरण करून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले. मोबाइल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली. हे दोन्ही संशयित नाशिकमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.