रणरणत्या उन्हात तापलेल्या आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, देवळा आणि मालेगावसह काही तालुक्यात १० ते १५ मिनिटे पावसाचा शिडकावा झाला. अन्य भागात ढगाळ वातावरण होते.
गेल्या तीन ते चार आठवडय़ांपासून तापमानाचा पारा चांगलाच उंचावला आहे. गुरूवारी जिल्ह्यात हंगामातील सर्वाधिक म्हणजे ३९ अंश तापमानाची नोंद झाली होती.
यामुळे मार्च महिन्यात तापमान ४० अंशांचा टप्पा ओलांडणार असल्याची धास्ती व्यक्त होत असताना शुक्रवारी वातावरणात अचानक बदल झाले. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. निफाड व देवळा तालुक्यात दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. निफाड तालुक्यात काही काळ जोरदार पाऊस झाला. नंतर त्याची रिपरिप सुरू होती. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. देवळा तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला. मालेगाव तालुक्यात दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला. येवला तालुक्यातील काही भागातही हलक्या सरी कोसळल्याचे सांगण्यात आले. या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला. परंतु, ही स्थिती फार काळ टिकणारी नाही. उलट पावसामुळे उकाडय़ात अधिकच वाढ होणार असल्याची धास्ती व्यक्त केली जात आहे.