जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील जैवविविधतेची हानी; जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे साकडे
नाशिक : महिनाभरात जिल्ह्यात ब्रम्हगिरी (त्र्यंबकेश्वर), रामशेज दुर्ग (दोन वेळा), नाशिक तालुक्यातील मायना डोंगर वनक्षेत्र तसेच मातोरी (ता. नाशिक) गावाच्या गायरानात वणव्यांमुळे मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील जैवविविधता, वन्यजीव, प्राणी, पक्षी. त्यांची अंडी, घरटी, नैसर्गिक बीज, पुरातन झाडे, वनौषधी, गवत (चारा) जळून भस्मसात झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या वणव्यांबद्दल, जैवविविधतेच्या अपरिमित नुकसानीबद्दल सामाजिक पर्यावरण संस्थेच्या वतीने चिंता व्यक्त करण्यात आली असून हे वणवे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
येथील शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दऱ्यादेवी पर्यावरण यांच्या वतीने जिल्ह्यात सातत्याने लागणाऱ्या वणव्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर टेकडय़ा, गडकोट आणि गायरानात नैसर्गिकपेक्षा मानवी दुष्कृत्यामुळे मोठय़ा प्रमाणात वणवे (आगी) लागत असल्याचा दावा या संस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. महिनाभरात चार ठिकाणी वणवा कसा काय लागू शकतो, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. एकूणच वणव्यात नैसर्गिक संपदेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. वणव्याची दाहकता वाढती आहे. वणव्यांमुळे पर्यावरण, गडकोट, डोंगर, टेकडय़ांची नैसर्गिक हानी तसेच वणवे रोखण्यासाठी उपायांकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.
नाशिक जिल्ह्यातील वन, पर्यावरण असुरक्षित आहे. याबाबत संबंधित खाते उदासीन असल्याचा आरोपही संस्थांनी केला आहे. या पाश्र्वभूमीवर, असुरक्षित नैसर्गिक,चराईक्षेत्र डोंगर, घाट, गडकोट, जंगल, टेकडय़ांच्या संरक्षणाच्या दृष्टीने तातडीने उपाय करावे, वणवा रोखण्यासाठी तसेच त्याची दाहकता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील वनक्षेत्र डोंगरांना जाळपट्टे दरवर्षी हिवाळय़ात उभारावे, गावागावातील वन व्यवस्थापन समित्यांना नैसर्गिक संसाधने, वन्यजीव, पक्षी संवर्धन आणि वणवा रोखण्यासाठी प्रशिक्षित करावे, (बहुतांशी ठिकाणी या समित्यांचे अस्तित्व कागदावरच आहे), वणवा लावणारे वनक्षेत्रात दारु, पार्टी करणारे, जुगारी, गर्दुल्ले, जंगलात, माळरानावर चुली पेटविणारे, शिकारी असे वणवा लावणारे गुन्हेगार पकडणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, वणवा क्षेत्र नुकसानीचे वास्तविक परीक्षण करावे, वणवा लावणाऱ्यांविरोधात वन-पर्यावरण विभागाने गुन्हे नोंदवावे मायना, रामशेज, मातोरी वनक्षेत्रात जीव धोक्यात टाकून वणवा रोखणारे, वणवा विझविणारे वृक्षवल्ली फाउंडेशन, दऱ्या देवी पर्यावरण, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक, दरी गाव, गवळवाडी, रामशेज(आशेवाडी, गाव) येथील पर्यावरण मित्र, युवक मंडळे यांच्या असामान्य कार्याची प्रशासनाने दखल घ्यावी, गावोगावी वणवा रोखणारी पथके तयार करावी, त्यांना प्रशिक्षित करून साधनसहाय्य, साहित्य द्यावे, अश्या संस्था, मंडळे, गावे आणि वृक्षमित्र संस्थांना वन पर्यावरण मंत्री विभाग, खाते यांनी विशेष सन्मानित करावे, आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना राम खुर्दळ, सागर शेलार, तुषार पिंगळे, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे आदी उपस्थित होते.
