नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त १० जून रोजी येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी १० वाजता झेंडावंदन होणार असून शहरात विविध भागात लोकहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रवादी वर्धापनदिन सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.
वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपल्या घरावर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा आणि स्टीकर लावणार आहे. १० ते १८ जून या कालावधीत ‘राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह’ शहरात साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहातंर्गत आरोग्य, कर्करोग तपासणी, वृक्षारोपण, रक्तदान या शिबिरांसह विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, मुख्य चौकात पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार याकरिता व्याख्यान, महिलांकरिता विविध उपक्रम असे जनहितार्थ कार्यक्रम शहरातील विविध भागात होणार असल्याचे शहराध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले.
सभासद नोंदणी अभियान
करोनामुळे बंद असलेले सभासद नोंदणी अभियान वर्धापनदिनापासून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील मुख्य चौकात, महत्वाच्या नाक्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कक्ष उभारून सर्वसामान्यांना पक्षाचे सभासद करण्यासाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी अंबादास खैरे, अनिता भामरे, मधुकर मौले, संजय खैरनार, धनंजय निकाळे, डॉ. अमोल वाजे आदी उपस्थित होते.