नाशिक : ६ एप्रिल या स्थापना दिनानिमित्ताने भाजपच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगर भाजप अध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली. १० एप्रिल रोजी श्रीराम नवमी कार्यक्रम, ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले जयंती, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती उत्सव, १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमत्ताने समाज उपयोगी उपक्रमांसह आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, नाले-नद्यांची साफसफाई, आरोग्य विषयक शिबिरे, स्नेहमेळावे आदींसह अनेक सेवाभावी उपक्रमांचे आयोजन भाजपतर्फे करण्यात आले आहे.  कार्यक्रमांचे नियोजन गावागावात, मंडला मंडलात तसेच प्रत्येक शक्ती केंद्र निहाय करण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी आठ वाजता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर भाजपचा ध्वज तसेच दारापुढे  कमळाची रांगोळी काढावयाची आहे.

 सकाळी आठ ते सकाळी १० या वेळेत पदयात्रा किंवा दुचाकी फेरी आपापल्या शक्ती केंद्रात काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी नऊ वाजता शक्ती केंद्रातील चौकांमध्ये भाजपचे ध्वजारोहण करून भारत मातेचे पूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या  विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती यावेळी जनतेला देण्यात येणार आहे. पक्षाच्या वाटचालीची माहितीही देण्यात येणार आहे. सकाळी १० नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनसंवाद कार्यक्रम चौका चौकात पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी कमीत कमी १०० ‘नमो अ‍ॅप’ डाउनलोड करून त्याची अधिक माहिती नागरिकांना द्यावी, अश्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

‘अभिमान अभियान’

शक्ती केंद्र प्रमुखांनी आपल्या निवासस्थानाच्या दारावर आपल्या नावाची पाटी लावावी, तसेच इतरांनीही आपल्या नावाची आपल्या पदाचा उल्लेख असलेली पाटी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी नागरिक स्नेह मिलन, सत्यनारायण पूजा, भारत माता पूजन, प्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रम करावे असे आवाहनही कार्यकर्त्यांना पालवे यांनी केले आहे. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेनुसार सहा ते १० एप्रिल या कालावधीत अभिमान अभियान राबविण्यात येणार असल्याचेही पालवे यांनी सांगितले. १० एप्रिल रोजी श्रीराम नवमी कार्यक्रम, ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले जयंती, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती उत्सव, १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवासह होणार आहे.