१५ कंपन्यांमार्फत ठेवी स्वीकारल्याचे उघड
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात मैत्रेय ग्रुपच्या १५ कंपन्या असून देशभरात वेगवेगळ्या शाखांमार्फत या ग्रुपने ठेवी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कंपन्यांमध्ये मैत्रेयच्या वर्षां सत्पाळकर आणि तिचा भाऊ जनार्दन अरविंद परुळेकर हे दोघेच संचालक असून त्यांनी दोन कंपन्यांमधून लाखो ठेवीदारांकडून पैसे स्वीकारून त्याचा वापर स्वत: स्थापन केलेल्या अन्य कंपन्यांमध्ये गुंतविल्याचे तपासात पुढे आले आहे. संबंधितांशी संबंधित १२५ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. सोमवारी येथील न्यायालयाने वर्षां सत्पाळकर यांची पोलीस कोठडी पुन्हा चार दिवसांनी वाढविली.
कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना परताव्यासाठी दिलेले धनादेश वटत नसल्यावरून तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सत्पाळकर यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना प्रथम तीन आणि नंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीची मुदत संपुष्टात आल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने तपास प्रक्रियेची माहिती देऊन या गुन्हय़ाची व्याप्ती वाढत असल्याचे नमूद केले.
आतापर्यंत एकूण २६३ ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून तक्रारींचा ओघ सुरूच आहे. अपहार झालेल्या रकमेचा आकडाही वाढत आहे. या वेळी मैत्रेयच्या वकिलाने सेबीच्या २०१३ च्या निर्देशानंतर ठेवीदारांकडून पैसे स्वीकारले नसल्याचे सांगितले. तसेच कंपनीने सर्व ठेवीदारांची मुदत पूर्ण झाल्यावर ८०० कोटींपैकी ७६७ कोटी इतकी रक्कम परत केली असल्याचा मुद्दा मांडला. तथापि, सरकारी पक्षाने त्यास आक्षेप घेतला.
प्रत्यक्षात ठेवीदारांना पैसे मिळाले नसून त्यांचे धनादेश वटत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्या अनुषंगाने तपास यंत्रणेने कागदपत्रेही सादर केली. त्यामुळे संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सत्पाळकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयितांनी गुंतवणूकदारांकडून संकलित केलेले पैसे स्वत:साठी वापरले. ते स्वत: संचालक असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेची तसेच बँकांमधून संशयितांच्या स्वाक्षरीने झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे. त्या दृष्टीने सेबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. मैत्रेयशी संबंधित १२५ बँक खाती गोठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला कंपनीचा संचालक जनार्दन परुळेकर (वसई) हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.