नाशिक : वृक्ष संवर्धनासाठी ब्रह्मगिरी पर्वतावरील वनविभागाची संपूर्ण जागा वृक्षतोडीसारख्या मानवी हस्तक्षेपापासून संरक्षित करण्यासाठी नैसर्गिक कुंपण करावे, यासह इतर काही मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरण प्रेमींच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.
दक्षिण गोदावरीचे उगमस्थान असलेले ब्रह्मगिरी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ब्रह्मगिरी हा पर्वत नसून महाराष्ट्राच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक अभिमानाचा केंद्रिबदू आहे. जैवविविधतेने संपन्न नाथांचा ब्रह्मगिरी पर्वत पूर्णत: बोडका झाला आहे. नाशिकच्या पर्जन्यमानात ब्रह्मगिरी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तसेच मराठवाडय़ाच्या पाणीपुरवठय़ासाठीही ब्रम्हगिरीचे महत्त्व आहे. ब्रह्मगिरीवर अनेक तीर्थकुंड असूनही वृक्षसंपदेअभावी येथील वनवासी, आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत आहे. वृक्षसंपत्तीवर अवलंबून असणारी नैसर्गिक अन्नसाखळी या भागात नामशेष होत आहे. परिसरातील शहरी भागात वन्य प्राण्यांचे स्थलांतर नित्याचे झाले आहे. जलस्रोत, वन्यप्राणी, निसर्ग जीवजंतू सर्वाचाच गाभा असणाऱ्या वृक्षसंपदेचे ब्रह्मगिरी पर्वतावर संवर्धन होणे गरजेचे आहे. ब्रह्मगिरीवरील वृक्षसंपदेचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी त्यांना त्यासाठी काही मर्यादा येतात.
वृक्षसंवर्धनासाठी ब्रह्मगिरी पर्वतावरील वनविभागाची संपूर्ण जागा वणवा, वृक्षतोड यांसारख्या मानवी हस्तक्षेपापासून संरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नैसर्गिक कुंपण करण्यासह प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही जागा संरक्षित करणे, भाविकांना पर्वतावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांना संरक्षक जाळी बसविणे, मनरेगासारख्या योजनेचा लाभ घेऊन वनविभागाच्या सहकार्याने येथील आदिवासी बांधवांना ब्रह्मगिरी पर्वतावर यावर्षी पाच लाख रोपांची लागवड करून आदिवासी बांधवांकडून या वृक्षसंपत्तीचे संगोपन करण्यासह त्यांना मोठय़ा प्रमाणात रोजगार देणे, असे उपाय पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुचविण्यात आले आहेत.
रोपे जगविण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था शेजारील धरणातून गावकऱ्यांसाठी होत असलेल्या जलवाहिनीतून तसेच पाण्याच्या टाक्या वाढवून करता येऊ शकेल, सरकारकडून संरक्षण आणि पाण्याची व्यवस्था झाल्यास वृक्ष संवर्धनाची जोपासना करण्याची जबाबदारी घेण्यास त्रंबकेश्वर देवस्थान, वनविभाग, गावकरी, त्रंबक नगरीतील अनेक निसर्गप्रेमी संस्था तसेच देशातील अनेक नामांकित सामाजिक संस्थाही तयार आहेत. ठिकठिकाणी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे कोणते परिणाम होत आहेत, हे सर्वानाच माहीत आहेत. त्यामुळेच ब्रम्हगिरी परिसरात वृक्षसंपदेची हानी रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक झाले आहे. किमान वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱ्यांच्या पाठीशी राज्य शासनाने उभे राहण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी निवेदनातून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetation brahmagiri environmentalist aditya thackeray forest department amy
First published on: 04-05-2022 at 00:02 IST