स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील गुन्हेगारांची हिंमत दिवसागणिक वाढत असून पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या घटना पुढे येत असतानाच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांची जाळपोळ करत संशयितांनी आपला वरचढपणा पुन्हा अधोरेखीत केला आहे.
विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या दोन मोटारींची संशयितांनी जाळपोळ केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्य़ांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने ठेवलेली आहेत. अन्य पोलीस ठाण्यांच्या आवारात अशी वाहने दृष्टिपथास पडतात.
या वाहनांचे सुटे भाग, बॅटरी, टायर्स, हॉर्न असे भाग चोरीला जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यात वेगळ्याच घटनेची भर पडली आहे. मागील वर्षभरापासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. गुन्हेगारी टोळक्यांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढत असल्याची सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.
काही महिन्यांपूर्वी दोन गटात वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न युवकाने केला होता. परंतु पोलिसांदेखत एका गटाने या युवकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली होती. म्हणजे, पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा हल्ला झाला होता. परंतु असे प्रकार घडुनही अट्टल गुन्हेगार आणि टोळक्यांवर कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा घटनांमधून गुन्हेगारांची हिंमत वाढत असून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या घडलेल्या घटनेने पुन्हा त्याचे प्रत्यंतर आले.
पोलीस ठाण्याच्या आवारात सोमवारी मध्यरात्री अडीच-तीनच्या सुमारास काही संशयितांनी प्रवेश करत जप्त केलेली मारूती व्हॅन, तवेरा या दोन गाडय़ा आग लावून पेटविल्या.
ही बाब लक्षात येईपर्यंत संशयित पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण करून ही आग विझविली.
ही वाहने पेटविण्यामागे नेमके काय कारण असावे, याचा सर्व अंगाने तपास केला जात आहे. पोलीस ठाण्यातील वाहने पेटविण्याच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.