४० समित्या आणि ५०० हून अधिक कार्यकर्त्यांचे योगदान  

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलन दिमाखदार पध्दतीने पार पडले. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी वेगवेगळय़ा समित्यांनी काम केले. या समित्यातंर्गत काम करणाऱ्या ५०० हून अधिक स्वयंसेवकांचे योगदान संमेलन यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण ठरले. या स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेत संयोजकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

सभा मंडप, पाहुणे, भोजन, वैद्यकीय सेवा, ग्रंथप्रदर्शन अशा वेगवेगळय़ा कामांशी संबंधित ४० समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. समितीत ज्येष्ठांचा वरचष्मा होता. त्यांच्या दिमतीला स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली. हे संमेलन पहिल्यांदा गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात होणार होते. हे ठिकाण शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने ६०० हून अधिक स्वयंसेवकांनी त्यासाठी नोंदणीही केली होती. परंतु, संमेलनाची जागा बदल झाल्यानंतर स्वयंसेवकांची संख्या कमी झाली.

भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात संमेलन निश्चित झाल्यानंतर ४५० जणांनी या ठिकाणी काम करण्याची तयारी दर्शविली. संमेलन स्थळावर आपत्कालीन परिस्थती उदभवल्यास काय करावे, गर्दीवर नियंत्रण कसे मिळविणार, सभा मंडपात गर्दी कशी बसविणार, यासह अन्य गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग झाले. यामध्ये भुजबळ नॉलेज सिटी, क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, पंचवटी महाविद्यालय, विधी महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वाना पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि स्वयंसेवक म्हणून ओळखपत्र देण्यात आले. संमेलनाच्या तीन दिवसात ही युवा मंडळी सकाळी सातपासून संमेलन संपेपर्यंत विनामोबदला झटत होती, अशी माहिती स्वयंसेवक समन्वयक प्राचार्य संतोष मोरे यांनी दिली.

संमेलनाच्या समारोपानंतर या सर्व मंडळींना सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. कामाचे नियोजन करताना हॉटेल व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी भोजन, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी करोना तपासणी, लसीकरणात महत्वपूर्ण भूमिका निभावली. विधी, तक्रार या समितीकडून विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी काम पाहत होते, असे मोरे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी गझल कट्टय़ासाठी काम केले. कविता-गझल यांची आवड असली तरी सभागृहात थांबताच आले नाही. या तीन दिवसाच्या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कवी-गझलकार आले होते. त्यांची नोंदणी झाली का, त्यांना सन्मानपत्र मिळाले का, यासह वेगवेगळी कामे करतांना आम्ही समुहातील सगळे एकमेकांशी कसे जोडले गेलो कळलेच नाही. वेगवेगळय़ा शाखेचे असलो तरी सर्व आता मित्र-मैत्रीणी झालो आहोत. संमेलन संपले असले तरी आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहु असे सांगतच एकमेकांचा निरोप घेतला. निरोपाचा क्षण आमच्यासाठी त्रासदायक होता, असे  समन्वयक अक्षता देशपांडे यांनी सांगितले.