जनजागृती कार्यक्रमात सूरज मांढरे यांचे प्रतिपादन
मतदान यंत्रे सुरक्षित असतात. त्यात कोणताही फेरफार करता येत नाही. मतदान यंत्रात बदल केले जातात, ही केवळ मानसिकता आहे. मतपेटय़ा होत्या, तेव्हां त्या बदलल्या जात असल्याची पूर्वीची मानसिकता होती. तीच मानसिकता मतदान यंत्रांविषयी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मांडले.
येथील हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी राजकीय जनजागृती कार्यक्रमात मांढरे ‘आचारसंहिता आणि निवडणूक कामकाज’ या विषयावर बोलत होते.
आचारसंहिता म्हणजे कायदा नव्हे, तर अनेक कायद्यातील कलमांचे एकत्रीकरण त्यात करण्यात आले आहे. आचारसंहिता समजावून घेऊन त्या मार्गाने आपण जात आहोत की नाही, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी माध्यमे आणि पत्रकारांची असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहिता आधीपासूनच अस्तित्वात होती. या आचारसंहितेचा प्रभावी वापर लोकशाही बळकट करण्यासाठीच आहे. आचारसंहिता हा स्वतंत्र कायदा नव्हे, तर अनेक कायद्यातील कलमांचे एकत्रीकरण आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ पार पाडण्यासाठी आचारसंहिता आहे. आपली लोकशाही सुदृढ होण्यासाठी माध्यमे, पत्रकार, समाज माध्यमांवरील वापरकर्ते यांनी जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षाही मांढरे यांनी व्यक्त केली. आचारसंहितेतील निवडणुकीची अंमलबजावणी, पक्षांच्या बैठका, जाहीरनामे, मतदानाचा दिवस, मतदान केंद्रे, निवडणूक निरीक्षक, अधिकारी आणि मतदारांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत अशा आठ मुद्दय़ांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला.
प्रा. रमेश शेजवळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, उपप्राचार्या मृणाल देशपांडे आदी उपस्थित होते.