नाशिक : वणी येथील सूर्योदय हाॅस्पीटलमध्ये प्रसूतीवेळी मातेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरुन डाॅक्टरां विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना जून २०२४ मधील असतांना ११ महिन्यांनी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोहन जाधव यांची सून पौर्णिमा उर्फ रुपाली जाधव (रा.हरणटेकडी, ता.सुरगाणा) या वणी येथील डाॅ. अमितकुमार बोथरा यांच्या सूर्योदय हाॅस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. प्रसूतीदरम्यान पौर्णिमा आणि बाळाचा मृत्यू झाला. रुग्णालयात पुरेशी सुविधा नव्हती. तसेच प्रसूतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत. पुरेशी व्यवस्था नसतांनाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मोहन जाधव यांचा आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हा उशीराने नोंदविण्यास लालफितीचा अडसर ठलला. वणी पोलिसांनी सुरुवातीच्या पाच-सहा दिवस तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. नंतर सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार पाठवली. त्याठिकाणी चार, पाच महिने चकरा मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर या संदर्भात पोलिसांनी आरोग्य विभागाकडे प्रकरण पाठवले. त्याची चौकशी होण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला. या चौकशीत डाॅ. बोथरा यांचा हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणाही झाल्याचा अहवाल वणी पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.