महाराष्ट्रात मुबलक दारूमुळे खेडी व शहरे असुरक्षित झाली असून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम पुढील अनेक पिढय़ांवर होणार आहेत. महाराष्ट्र दारूमुक्त केल्यास राज्यातील गुन्हेगारी, अपघात व व्यसनांमुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण निश्चितच घटेल, असे मत महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांनी व्यक्त केले आहे. राज्य शासनाने तातडीने महाराष्ट्र दारूमुक्त करण्याचा निर्णय न घेतल्यास वारकरी महामंडळ राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित बैठकीत दिला.
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज पौषवारी यात्रोत्सवानिमित्त वारकरी महामंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वारकरी प्रबोधन समितीचे प्रमुख रामेश्वरशास्त्री यांनी दारूबंदीसाठी अखंडपणे वारकरी राज्यभर कीर्तन, प्रवचनातून प्रबोधन करत असल्याचे सांगितले. वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात ग्रामसभेचे ठराव होतात. प्रसंगी दारू माफियांकडून अनेकदा कार्यकर्त्यांना मारहाण होते. व्यसनी व्यक्तीकडून घरातील सदस्यांचा छळ होतो. अशा अनेक घटनांचे मूळ दारू असल्याने महाराष्ट्रात दारूबंदी काळाची गरज आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात दारू अड्डय़ांचा सुळसुळाट आहे. दारूला राजाश्रय मिळत असल्याने दारूबंदी होऊच दिली जात नाही.
ग्रामसभेचे ठराव असतानाही दारूबंदी होत नसेल तर ग्रामस्थांनी काय करावे, असा प्रश्न रामेश्वरशास्त्री यांनी उपस्थित केला आहे. त्यावर उपाय म्हणून आता जिल्ह्य़ात दारूबंदी आंदोलन करावे लागेल, असे महामंडळाचे जिल्हा सचिव पुंडलिकराव थेटे यांनी नमूद केले. याप्रसंगी महामंडळाचे जिल्हाप्रमुख पंडित महाराज कोल्हे, श्रावण महाराज अहिरे, लहानू पेखळे, रा खुर्दळ आदी उपस्थित होते.