तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जायकवाडीला पाणी सोडू नये याकरिता दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर नाशिकमधील धरणांचे दरवाजे गुरुवारी सकाळी उघडून विसर्ग करण्यात येणार आहे. या संदर्भातील पूर्वतयारी आधीच करण्यात आली आहे. तीन दिवसांत नाशिकमधील धरणांचे पाणी बंदोबस्तात जायकवाडीत पोहोचविले जाणार आहे. या काळात गोदावरी, दारणा नदीपात्रात कोणी पाणी चोरीचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरऐवजी मुकणे धरणातून पाणी देण्याचा विषय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर मांडला गेला होता. प्राधिकरणाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, त्या अनुषंगाने बदल न झाल्यामुळे अखेर गंगापूरमधून पाणी सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धरणांमधून पाणी सोडायचे की नाही, याचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. बुधवारी न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने २३ ऑक्टोबरच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नव्याने तयारीला सुरूवात केली. गोदावरी, दारणा नदी काठावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास अवधी लागेल, हे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी सकाळचा मुहूर्त निश्चित केला.

जायकवाडीसाठी गंगापूर आणि पालखेड धरण समूहातून प्रत्येकी ६०० आणि दारणा धरण समूहातून २०४० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा आदेश आहे. त्यातील गंगापूर, दारणा धरणांमधून सकाळी विसर्ग केला जाईल. गंगापूरमधून तीन हजार क्युसेस, तर दारणामधून १५ हजार क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. चोवीस तासात ते जायकवाडीला पोहचेल. तीन दिवस या धरणांमधून विसर्ग केला जाईल. पाणी सोडण्यास होणारा विरोध लक्षात घेऊन ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडय़ांना पाचारण केले गेले असून गंगापूर, दारणा धरणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी नदीकाठावरील गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच कोणी पात्रातून पाणी चोरीचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

‘भाजप’च्या आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर गंगापूरऐवजी मुकणे धरणातून पाणी जायकवाडीला देण्याचा पर्याय सुचविला होता. प्राधिकरणाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तथापि, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने २३ ऑक्टोबर रोजीचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे गंगापूरमधून पाणी सोडावे लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गंगापूर’ला पर्याय नाही

नाशिक, नगरमधील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गंगापूरऐवजी मुकणे किंवा अन्य धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे असा कोणताही पर्याय सुचविलेला नाही. आधीच्या निर्णयानुसार गंगापूर, दारणा, पालखेड धरण समूहातून पाणी सोडण्यास सांगण्यात आले आहे.

-अजय कोहिरकर

(कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water from nashik dams will release after supreme court rejected petition
First published on: 01-11-2018 at 03:27 IST