विहिरी खोलीकरण, कूपनलिकांद्वारे पाण्याचा शोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या तालुक्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या इगतपुरीत लहान-मोठी ११ धरणे आहेत. निम्म्या महाराष्ट्राला पाणी पुरविणाऱ्या या तालुक्याला सध्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी मिळेल तिथे विहिरीचे खोदकाम, खोलीकरण अथवा कूपनलिकेसाठी कसरत करत आहे.

इगतपुरी तालुक्यात साधारणत: साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते, तरीही टंचाई तालुक्याच्या पाचवीला पुजलेली आहे. तालुक्यात मुकणे, दारणा, वैतरणा, कडवा, वाकी अशी धरणे आहेत. या धरणांतील पाण्याचा लाभ स्थानिकांना फारसा मिळत नाही. प्रचंड पाऊस पडणारा हा तालुका उन्हाळ्यात पाण्यासाठी व्याकूळ होतो. मे महिन्यातील टळटळीत उन्हात ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढली, तसतशी विहिरीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. परिणामी, उभी पिके जगविण्यासाठी विहिरीत कूपनलिका करून पाण्याचा शोध घेतला जात आहे. कूपनलिका करण्याचे प्रमाण वाढल्याने जमिनीची अक्षरश: चाळण होत आहे. शेतातील पिकांना पाणी देणे गरजेचे असते. कोणी टँकरचा तर कोणी विहीर खोदण्यास अधिक महत्त्व देतो. पाण्याच्या शोधासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही फारसा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

सद्य:स्थितीत इगतपुरी तालुक्यात विहिरीच्या खोदकामासह कूपनलिका करण्याचा धडाका शेतकऱ्यांनी लावला आहे. शेतीचे तुकडे झाल्यामुळे क्षेत्र कमी झाले. कमी शेती असलेल्या प्रत्येकाला विहीर खोदणे, कूपनलिका करणे परवडत नाही. आपली हक्काची विहीर असावी, या उद्देशाने प्रत्येक लहान शेतकरी विहीर खोदकामास पसंती देत आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी त्याने ठेवली आहे. विहीर खोदून अथवा कूपनलिका करून पाणी लागेलच याची खात्री नाही. वाढत्या उन्हामुळे विहिरी कोरडय़ाठाक पडल्याने अशा वेळी विहिरीचे काम करणे सोपे जाते. परिणामी, अशा वेळी जमिनीत कूपनलिका घेण्यासह विहिरी खोलीकरणाला महत्त्व दिले जात असून सद्य:स्थितीत तालुक्यात हा धंदा तेजीत सुरू आहे. त्यासाठी राजस्थान, कर्नाटक राज्यातील कूपनलिका यंत्रणाधारक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. स्थानिक आमदार निर्मला गावित यांच्या म्हणण्यानुसार वैतरणा, मुकणे तसेच दारणा धरणाचे पाणी आरक्षित झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या कमी झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घोटी बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी पाण्यावरून होणारे वाद टाळायचे असतील तर जलसंधारणाच्या कामांना निधी द्यावा लागणार असल्याचे सांगितले. जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड देणे आणि पावसाचा प्रत्येक थेंब शिवारात अडविण्यासाठी लोकचळवळ निर्माण करावी लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लहानेही पाण्याच्या शोधात

इगतपुरी तालुक्यात टंचाईने डोके वर काढले आहे. हंडाभर पाण्यासाठी लहान मुलांनाही हंडे, बादल्यांचा भार उचलावा लागत आहे. भर उन्हात तासन्तास विहिरी, कूपनलिकाजवळ लहान मुले उभी असतात.

टंचाई मोठय़ा प्रमाणात जाणवत असून जनावरे सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी ठोस उपाय शासन, लोकप्रतिनिधींनी केले पाहिजेत. टंचाईमुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे.

–  काळू बोडके (शेतकरी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity issue in igatpuri taluka
First published on: 16-05-2018 at 01:41 IST