जळगाव : जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या मध्यम आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. सर्व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात कुठेच अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र पाण्याची चिंता कायम आहे.

जिल्ह्यासाठी तारणहार ठरणाऱ्या तापी नदीवरील हतनूर, गिरणा आणि वाघूर या मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १०२७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, १७ जूनअखेर तिन्ही प्रकल्पांमध्ये ४२२.३९ दशलक्ष घनमीटर (४१.१२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के जास्तीचा पाणीसाठा दिसत असल्याने, सध्या तरी चिंता नाही. मात्र, पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी तिन्ही प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील शेळगाव बॅरेजसह बोरी, अंजनी, बहुळा, मन्याड, तोंडापूर, गूळ, भोकरबारी, अग्नावती, मोर, सुकी आणि मंगरूळ, या मध्यम प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ३१४.२५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, सद्यःस्थितीत सर्व प्रकल्पांमध्ये जेमतेम ९५.४९ दशलक्ष घनमीटर (३०.३९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चार ते पाच टक्के जास्तीचा पाणीसाठा जास्तीचा दिसत असला, तरी त्यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, लहान- मोठे नाले आणि ओढ्यांवर उभारलेले लघु पाटबंधारे प्रकल्प उन्हाळ्याच्या दिवसातच कोरडे पडले होते. अर्थात, शेती शिवारातून चांगले पाणी वाहून निघाल्याशिवाय लहान प्रकल्पही भरणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.