अंध अपंगांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम
दिवाळीनिमित्त घर, कार्यालय तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. घरात किंवा कार्यालयात नको असलेले सामान अगदी जुन्या कपडय़ांपासून ते पाय तुटलेल्या खुर्चीपर्यंत, काही वेळा अनावश्यक म्हणूनही सामान टाकून दिले जाते. केवळ आपली गरज नाही म्हणून काही वेळा हा अनावश्यक पसारा भंगारवाल्याचे धन होते. मात्र त्यातून आपल्या पदरी पडणारी रक्कमही तुटपुंजी असते. ही बाब लक्षात घेऊन येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या (नॅब) वतीने एक तपापूर्वी सुरू केलेल्या ‘चॅरिटी सेंटर’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून अंध-अपंगाच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अनावश्यक सामान घरातून बाहेर टाकण्याची मानसिकता लक्षात घेता येथील नॅबने एक तपापूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी चॅरिटी सेंटरची संकल्पना प्रत्यक्षात आणली. ज्याला आपल्या घरात जे सामान नकोय, ते त्याने केंद्राला देणगी स्वरूपात दान करायचे. त्याची रीतसर पावतीही केंद्र त्यांना देणार. केंद्रात जमा झालेली वस्तू औद्योगिक वसाहतीतील हमरस्त्यावर छोटेखानी स्टॉल लावून अत्यल्प किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात येईल. यामुळे गरजूला अत्यंत कमी किमतीत चांगली वस्तू मिळेल आणि केंद्राकडेही पैसा जमा होईल असा हा उपक्रम. त्यातून जमा होणाऱ्या निधीचा अंध, अपंगांच्या पुनवर्सनाच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यासाठी उपयोग होईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला. नॅबच्या या संकल्पनेला नाशिककरांनी सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने नॅब वेळोवेळी आवाहनही करते. जुन्या फाटक्याऐवजी काहीसे जुनाट झालेले कपडे, घरगुती साहित्य यात दैनंदिन वापरातील भांडय़ांसह पंखा, नादुरुस्त टीव्ही, शीतकपाट, संगणक, जुने फर्निचर असे जे काही घरात अनावश्यक वाटते ते केंद्राकडे जमा होऊ लागले. सातपूर औद्योगिक वसाहतीत केंद्र असल्याने परिसरातील कामगार वर्ग बहुतांश मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय आहे. त्यांना हे साहित्य अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे दिवाळी किंवा अन्य कोणताही सण-उत्सव कालावधीत अशा गरजूंना कापड किंवा काही साहित्य खरेदी करायचे असल्यास ते कमी किमतीत उपलब्ध होते. त्यात लहान मुलांचे कपडे १०-३० रुपये, साडय़ा २०-५० रुपये अशा दराने विक्री केली जाते.
कामगार वर्गाकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच रमेश आर्टचे किशोर पवार यांनी आपल्याकडील तीन बेड, काही भांडी, फर्निचर यासह अन्य सुस्थितीतील वस्तू असा एक मालमोटार भरून साहित्य केंद्राकडे सुपूर्द केले.
त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून नॅबच्या विविध शाखांना अर्थसाहाय्य केले जात आहे. अंध-बांधवांना आवश्यक साहित्य, त्यांचे आर्थिकदृष्टय़ा पुनवर्सन व्हावे या दृष्टीने निधी उपलब्ध करून देणे, यासह त्यांना कौशल्यपर प्रशिक्षण वर्ग सुरू करणे असे विविध उपक्रम सुरू असल्याची माहिती नॅबचे जनसंपर्क समितीचे प्रमुख शाम पाडेकर यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती तसेच साहित्य देण्यासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅब केंद्राला भेट देण्याचे आवाहन नॅबने केले आहे.