धुळे – धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद कॉंग्रेस अंतर्गत उमटले आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक कॉंग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी धुळे लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यास डावलून जिल्हाबाहेरचा उमेदवार दिला आहे. उमेदवार बदलून द्यावा अन्यथा धुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विरोधाची भूमिका घेतील, असा इशारा सनेर यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कॉंग्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी दिली जाते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनेर यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करून संघटनात्मक पातळीवर तसेच मतदारसंघात संपर्क देखील सुरू केला होता. महाविद्यालयीन जीवनापासून सनेर हे कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहेत. युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता ते धुळे जिल्हाध्यक्ष अशी त्यांची मजल आहे. डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने सनेर नाराज झाले. त्यांनी गुरुवारी सकाळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविला. मतदारसंघाबाहेरील उमेदवारांना उमेदवारी देत पक्षाने मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याचे सनेर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा – ‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

सनेर यांनी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतांनाच पक्षश्रेष्ठींना उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. केवळ गरीब आहे म्हणून उमदेवारी नाकारून पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंतांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी, अशी भावना असल्याचे सनेर यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the reason for dhule district congress president resignation ssb