पालघर: शहरात भर वस्तीतून एका हॉटेल कर्मचाऱ्याच्या अडीच वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण करून पळ काढणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहरातील साई रेसिडेन्सी हॉटेलमध्ये नीरज वर्मा हा कर्मचारी काम करीत असून तो आपल्या पत्नी व अडीच वर्षांच्या लहान बाळासह हॉटेलमध्येच राहात आहे. सोमवारी हे लहान बाळ हॉटेल आवारात खेळत असताना टेम्भोडे येथील एका महिलेने त्याला फूस लावून पळविले. मुलगा आवारात दिसत नाही म्हणून नीरज व त्याची पत्नी त्याचा शोध घेऊ लागले. ही घटना त्यांनी समाजमाध्यमांसह आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितली.

दरम्यान, हॉटेल आवारात भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ही महिला मनोर महामार्गानजीक क्रिस्टल पार्क परिसरात त्या बाळासह दिसली. त्या बाळानेही भाजीविक्रेत्याला पाहताच त्याकडे धाव घेतली. त्याने या महिलेकडे विचारणा केली असता ती बनाव करू लागली. या वेळी तिला येथील नागरिकांनी पकडून ठेवले व याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या महिलेला अटक केली व बाळाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. याप्रकरणी अपहरण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पौर्णिमा मोरे या महिलेवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.