पाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या नाशिक जिल्ह्यात पाणी हा अक्षरश: जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. पाणी भरताना धक्का लागल्याबद्दल विचारणा करणाऱ्या महिलेचा एकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यात घडली. दुसरीकडे दुष्काळी भागासाठी सोडलेल्या आवर्तनातील पाणी चोरणाऱ्यांवर धडकपणे फौजदारी कारवाई सुरू झाली आहे. पाणी लंपास केल्या प्रकरणी निफाड व पिंपळगाव पोलीस ठाण्यात १२ संशयितांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनाक्रमामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके बसत आहेत. टंचाईमुळे ग्रामीण भागात वणवण सुरू असताना पाणी हे वादाचे कारण ठरू लागले असल्याचे दिसत आहे. सुरगाणा येथील हनुमंता शिवार परिसरात झरा आहे. या झऱ्यावर रविवारी दुपारी गावातील मंजुळा वाघमारे (६२) या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. पाणी भरून रस्त्याकडे येत असतांना गावातील संशयित चंदन गाढवे (४८) याचा त्यांना धक्का लागला. मंजुळा यांनी त्यावर संताप व्यक्त केला असता संशयिताने त्यांना शिवीगाळ करत दंडुक्याने मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेत मंजुळा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अंतर्गत रक्तस्त्रावने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी संशयिताविरूध्द सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गाढवेला अटक करण्यात आली आहे.
टंचाईमुळे पाणी चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांना व पाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. परंतु, मनमाड, येवला व नांदगाव सारख्या मोठय़ा शहरात टँकरने पाणी पुरविणेही अवघड होत आहे. या भागात तीव्र टंचाई आहे. या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने उपरोक्त भागासाठी आवर्तन सोडले आहे. सद्यस्थितीत असे सोडलेले पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचविणे आव्हानात्मक ठरले आहे. वाहत्या पाण्यात हात धुणाऱ्यांची संख्या कमी नाही. जलवाहिनी अथवा जलपरी सोडून पाण्याचा उपसा करून पाणी पळविले जाते. निफाड तालुक्यात नैताळे शिवारात पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा उपसा करताना संशयित बाळासाहेब बोरगडे यांच्यासह १२ शेतकरी आढळून आले. विना परवानगी पाणी उपसा करत असल्याची तक्रार पाटकरी फकिरा फड यांनी निफाड पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्याप कोणाला अटक झालेली नाही. तसेच पालखेड शिवारात रात्री डाव्या कालव्याला पाणी सोडले असतांना मोटारीने उपसा करत हे पाणी शेतातील विहिरीत साठवताना उत्तम होलगडे आणि अन्य काही जण आढळून आले. या मोटारी जप्त करत त्यांच्याविरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.