नाशिक : सासरी आणि माहेरीही जाण्यास मुलीने नकार दिल्याने नैराश्यातून सोमवारी सायंकाळी पंचवटी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर पेटवून घेतलेल्या हरजिंदर अमरितसिंग संधू (५५, रा. पंचवटी) या जखमी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.
हरजिंदर यांची मुलगी अमनप्रित सिंग हिचा विवाह १८ जानेवारीला रायपूर येथील राजिंदरसिंग पड्डा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने अमनप्रित दोन दिवसांपूर्वी सासरी कोणालाही न सांगता रायपूर येथून नाशिकला निघून आली. नाशिकला आल्यावर ती माहेरी न जाता मैत्रिणीकडे थांबली.
दरम्यान, सासरकडील मंडळींनी रायपूर पोलीस ठाण्यात अमनप्रित बेपत्ता असल्याची तक्रार दिली. संधू कुटुंबीयांना अमनप्रित गंजमाळ येथील मैत्रिणीकडे राहत असल्याची माहिती मिळाली. तिला कुटुंबातील अन्य सदस्यांनी घरी येण्याची विनवणी केली. मात्र तिने माहेरी तसेच सासरी जाण्यास नकार दिला. तसा जबाब पोलीस ठाण्यात अन्य नातेवाईकांसमोर लिहून देत असताना हरजिंदर यांनी बाहेर येत दुचाकीतील पेट्रोलने भरलेली बाटली स्वतच्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले.
हरजिंदर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हरजिंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.