पंचवटीतील टकलेनगर भागात एका महिलेची राहत्या घरी हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती भास्कर पाटील (५४) असे या महिलेचे नाव असून त्या शिक्षिका असल्याचे सांगितले जाते. टकलेनगरमधील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये त्या वास्तव्यास होत्या. काही वर्षांपासून त्या पतीपासून वेगळे राहत होत्या. मुलगा मुंबईला नोकरीस आहे. यामुळे फ्लॅटमध्ये त्या एकटय़ाच राहत असत. दुपारी घरकाम करणारी मोलकरीण नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी आली.
त्यावेळी दरवाजा उघडाच होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता पाटील या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मोलकरणीने तातडीने ही माहिती शेजारील रहिवाशांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील किंमती वस्तू ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. यावरून चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली नसल्याचा अंदाज पोलीस यंत्रणेने वर्तविला आहे.