‘स्वराज्य संघटने’च्या आंदोलनाला हिंसक वळण
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी ‘स्वराज्य महिला संघटने’ने बुधवारी पुन्हा एकदा धडक दिली असता त्यांना स्थानिक महिलांसह विश्वस्तांपैकी काही जणांनी मारहाण केली. या प्रकरणी माजी नगराध्यक्षांसह १५० जणांवर विनयभंग, मारहाण, धमकावणे; आदी गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. स्वराज्य संघटनेच्या महिलांनी गुरूवारी पुन्हा एकदा मंदिर प्रवेशाचा निर्धार व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांची ‘भूमाता ब्रिगेड’ आणि वनिता गुट्टे यांची ‘स्वराज्य महिला संघटना’ आंदोलन करीत आहेत. मंगळवारी सायंकाळी स्वराज्य संघटनेच्या गुट्टे आणि कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा हट्ट धरल्याने त्यांना रोखण्यासाठी मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी मुख्य दरवाजा वगळता इतर तिन्ही दरवाजे बंद केले. त्यामुळे रात्री या महिलांना मंदिर परिसरात प्रवेश करता आला नाही. रात्री उशीरापर्यंत या महिला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसून राहिल्या. बुधवारी सकाळी मंदिराचे प्रवेशद्वार खुले झाल्यावर महिलांनी देवस्थानने घातलेल्या अटी-शर्तीसह मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यापुढे काही स्थानिक महिला दर्शनासाठी उभ्या असल्याने गर्भगृहातून दर्शनासाठी ठरवून दिलेली सात वाजेपर्यंतची वेळ टळून गेली. वेळ संपल्याचे कारण देत स्वराज्य संघटनेच्या महिलांना रोखण्यात आले. परंतु, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच मंदिर प्रशासन, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यां यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहोचले.
या सर्व प्रकारात माजी नगराध्यक्षा अनघा फडके, तुंगार घराण्यातील पुजेचे मानकरी धनंजय तुंगार, योगेश तुंगार, प्रशांत तुंगार यांचा पुढाकार राहिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वनिता गुट्टे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. शारदा मठपती या आंदोलक महिलेच्या पाठीवर मारहाणीचे व्रण असल्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी १५० पेक्षा अधिक जणांविरूध्द गुन्हा नोंदविला. मात्र पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून घेण्याची औपचारिकता पार पाडल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला.
आंदोलनकर्त्यां महिला कधीही येतात आणि दर्शन घेण्याचा अट्टाहास करतात. त्यासाठी आकांडतांडव करणे, आरडाओरडा करणे या पद्धतीचा अवलंब करतात. केवळ प्रसिद्धी मिळवत गाभाऱ्यात प्रवेश मिळवायचा एवढाच त्यांचा प्रयत्न आहे.
– प्रशांत गायधनी,
देवस्थान समिती सदस्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवस्थान समितीने दर्शन रांगेत स्थानिक महिला उभ्या केल्या. त्या पुढे सरकतही नव्हत्या. आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर स्थानिकांनी अंगावर काचेची पावडर टाकली. त्यामुळे अंगावर पुरळ उठले आहे. त्यानंतर आम्हाला मारहाण व शिवीगाळही झाली.
– वनिता गुट्टे, अध्यक्षा,
स्वराज्य महिला संघटना

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women activists manhandled at nashik trimbakeshwar temple 200 booked
First published on: 21-04-2016 at 01:33 IST