नाशिक – जिल्ह्यात पाणी टंचाई जाणविण्यास सुरूवात झाली असून इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरेनंतर पाण्यासाठी देवरगावचे ग्रामस्थ बुधवारी आक्रमक झाले. महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. अखेर प्रशासनाने दुपारनंतर टँकर पाठवित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यानंतर महिलांनी मोर्चा स्थगित केला.

हेही वाचा >>> नाशिक : सर्वांना शिक्षण हक्क : सोडतीनंतरही शालेय प्रवेशासाठी प्रतिक्षा कायम

इगतपुरी तालुक्यातील देवरगाव साधारणत: ४०० हून अधिक लोकवस्तीचे गाव. या ठिकाणी आश्रमशाळा वस्ती, भोकरपाडा, धाब्यावाडी वस्ती या ठिकाणी काही दिवसांपासून टंचाई जाणविण्यास सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांकडून पाण्यासाठी सातत्याने मागणी करूनही ग्रामपंचायत स्तरावर कुठलीही हालचाल झाली नाही. ग्रामस्थांना विहीर, काश्यपी धरणाच्या जलसाठ्यावर अवलंबून रहावे लागते. पाण्यासाठी होणाऱ्या पायपिटीला कंटाळून देवरगाव येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी हंडा मोर्चा काढला. पाणी द्या, अशी मागणी करत त्याच ठिकाणी ठिय्या दिला.

या आंदोलनामुळे ग्रामसेवकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करत पुढील कार्यवाहीस सुरूवात केली. दोन तासानंतर गावात पाण्याचा टँकर आला. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. गावात टँकरने का होईना पाणी आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी २३७४ इच्छुकांचे अर्ज – दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 

चिंचलखैरे येथे पाणी पुरवठा सुरळीतपाणी टंचाईचे कारण पुढे करत खरेवाडी येथील वीज पुरवठा तोडत महिलांना विहिरीवर जावून पाणी भरा, असा सल्ला इगतपुरी पंचायत समितीने दिला होता. त्याविरोधात एल्गार संघटनेच्या वतीने आवाज उठवित ग्रामस्थांनी एकी करुन याविषयी जाब विचारला. अखेर ग्रामपंचायतीने वीज पुरवठा सुरळीत केल्यानंतर बुधवारी गावात नळ योजनेने पाणी आले.