कपालेश्वर मंदिर प्रवेशावरून भूमाता-पुजाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
कपालेश्वर मंदिरात महिलांच्या गर्भगृहात प्रवेशावरून गुरूवारी उडालेल्या रणकंदनात देवस्थान कार्यालयाची झालेली तोडफोड आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना झालेली मारहाण या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत पोलिसांनी शुक्रवारी संशयितांचा माग काढण्यासाठी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, हा वाद आहे. यावेळी विरोध करणाऱ्या पुरोहित आणि गुरव मंडळींनी संबंधित महिला ब्राम्हण वा गुरव जातीच्या नाहीत आणि संबंधितांचे १६ संस्कारही झाले नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारल्याची तक्रार भूमाता ब्रिगेडने केली. दुसरीकडे पुरोहित संघाने मंदिरात महिला व पुरूषांना एका विशिष्ट ठिकाणापर्यंत जाऊन दर्शन घेता येते. त्या पुढील भागात केवळ पुरोहित व गुरवांना प्रवेश आहे. सर्व भाविकांना जिथपर्यंत प्रवेश मिळतो, तिथपर्यंत जाऊन ब्रिगेडच्या महिलांनी दर्शन घेतल्यास त्यांचे स्वागत करण्याची दर्शविली आहे. विश्वस्त मंडळातील काही घटक जाणीवपूर्वक जातीयवादाचे विष पेरून मंदिरातील हजारो वर्षांची प्रथा, परंपरा उध्द्वस्त करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप संघाने केला आहे.
पुरूषांच्या बरोबरीने महिलांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा हक्क असल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या मुद्यावर लढणाऱ्या महिला संघटना ज्या ठिकाणी महिलांना प्रवेशास प्रतिबंध आहे, तिथे जाऊन प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने गुरूवारी भूमाता ब्रिगेडने कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न तीव्र विरोधामुळे अयशस्वी ठरला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर जमावाने हल्ला केला. देवस्थान कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. देवस्थानची महिलांच्या प्रवेशास कोणतीही हरकत नाही. पुजारी, गुरव आणि भाविकांनी त्यास कडाडून विरोध केला. पोलिसांनी ब्रिगेडच्या महिलांना बंदोबस्तात मंदिराच्या प्रांगणातून बाहेर काढून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केले. देवस्थान कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी विश्वस्तांमार्फत पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या अध्यक्षा तथा तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी दिली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जमावाकडून झालेल्या मारहाण प्रकरणी स्वतंत्र तक्रार देण्यात आली आहे. मंदिर व देवस्थान कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. जमावाने जो धुडगूस घातला, त्याचे छायाचित्रण कॅमेऱ्यात बंदीस्त झाले आहे. या चित्रणाची छाननी तपास यंत्रणा करत आहे.
या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. घटनास्थळी शासकीय छायाचित्रकारही उपस्थित होता. जमावाने देवस्थान कार्यालयाची दोनवेळा तोडफोड केली. प्रत्येक गुन्ह्यात सात ते आठ संशयित आहेत. त्यांची छाननी करण्यासाठी शासकीय छायाचित्रकाराकडून छायाचित्रे तसेच देवस्थानच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण तपासून संशयितांचा माग काढला जाणार आहे. या वादात जातीभेदाचा वेगळाच मुद्दा पुढे आला आहे. आम्ही ब्राम्हण वा गुरव जातीचे नाही म्हणून प्रवेश नाकारला गेल्याची तक्रार केली जात आहे. पुरोहित संघाने मंदिराच्या हजारो वर्षांच्या प्रथा-परंपरेचा संदर्भ देऊन मंदिरात पूजा व विशिष्ट भागापर्यंत जाण्याचा अधिकार देवतांनी केवळ ब्राम्हण व गुरवांना दिला असल्याचे म्हटले आहे. या मंदिरातील परंपरांना विश्वस्त मंडळातील काही घटक उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी ब्रिगेडच्या महिलांना या ठिकाणी दूरध्वनीद्वारे बोलावून प्रवेश करण्यास सांगितल्याचा आरोपही संघाने केला आहे.

महिला-पुरूषांना विशिष्ट भागापर्यंतच प्रवेश
या प्राचीन मंदिरात उपासनेची पध्दत वेगळी आहे. पुरूष अथवा स्त्री आतमध्ये (गाभारा) जात नाही. आतमध्ये केवळ पुजारी व गुरव जातात. या ठिकाणी पुरूष व महिलांना विशिष्ट ठिकाणावरून दर्शन घेता येते. पुरोहितांना आतमध्ये जाण्यासाठी नियमावलीचे पालन करावे लागते. शहरातील हजारो भाविक जिथपर्यंत प्रवेश आहे, तिथून दर्शन घेऊन देवाची उपासना करतात. तिथून महिलांनी दर्शन घेण्यास आमचा विरोध नाही. उलट भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी तिथून दर्शन घेतले असते तर त्यांचे स्वागत झाले असते. तथापि, मंदिरातील शांतता, उपासना, वैदीक परंपरा यांना नष्ट करण्याचे विश्वस्त मंडळातील काहींचे षडयंत्र आहे. त्यासाठी त्यांनी ब्रिगेडच्या महिलांना या ठिकाणी प्रवेशाचे आंदोलन करण्यास भाग पाडले. हजारो वर्षांपासूनचे हे नियम आहेत. या विषयावर पुरोहित महिला संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे.
– सतीश शुक्ल (पुरोहित संघ)

कपालेश्वर मंदिरात जातीभेद
महिला-पुरूष समानतेच्या मुद्यावर भूमाता ब्रिगेड लढा देत असताना कपालेश्वर मंदिरात जातीभेद अनुभवयास मिळाला. मंदिर प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी आपण ब्राम्हण अथवा गुरव समाजातील नाही आणि १६ संस्कारही झाले नसल्याचे कारण देऊन प्रवेश रोखल्याचे तृप्ती देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. देवस्थान महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास तयार होते. परंतु, पुरोहित व गुरव समाजातील मंडळींनी त्यास विरोध केला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आम्हाला मोटारीत बसवून त्या ठिकाणाहून दूर नेले. २६ मे रोजी ब्रिगेडच्या सदस्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी परत कपालेश्वर मंदिरात येतील.
– तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेड)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.