महिलांची अनास्था धक्कादायक
महिलांवर वाढणारे अत्याचाराचे प्रमाण, विविध माध्यमातून होणारे त्यांचे शोषण लक्षात घेऊन त्यांनी आपले हक्क व अधिकार या विषयी जागृत व्हावे, यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयरच्या वतीने मदतवाहिनी सुरू करण्यात आली होती. मात्र तिला नाशिकसह राज्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यानच्या काळात फेडरेशनने महिलांसाठी मदत केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन होत असले तरी आतापर्यंत एकच प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचू शकले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी सजग व्हावे यासाठी फेडरेशन प्रयत्नशील असले तरी महिलांची अनास्था या उपक्रमांना छेद देत असल्याचे अधोरेखित होत आहे.
साधारणत: पाच वर्षांपूर्वी महाकवी कालिदास कला मंदिरात महिला वकिलांची राज्यस्तरीय परिषद झाली. या परिषदेत महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे शोषण, त्यांचे हक्क व अधिकार, कायद्याने त्यांना मिळणारे संरक्षण अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पुढे यावे यासाठी फेडरेशनने संकेतस्थळाच्या माध्यमातून मदतवाहिनी सुरू केली. संकेतस्थळाच्या माध्यमातून ही वाहिनी सक्रिय होती. पण, वर्षभरात केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच महिलांनी संकेतस्थळास भेट दिली. महिलावर्गाचा इंटरनेटवरील प्रतिसाद लक्षात घेऊन फेडरेशनने वकीलवाडी परिसरात मदत केंद्र सुरू केले. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिला या ठिकाणी वकिलांशी आपल्यावर होणारा अन्याय, अडचणी या विषयी खुली चर्चा करू शकतात. त्यांना त्याबाबत कायदेशीर सल्लाही मोफत दिला जातो. तसेच, न्यायालयात केस दाखल करावयाची असल्यास नाममात्र शुल्कात व्यवस्था केली जाते. आतापर्यंत अनेक महिलांनी केंद्राला भेट दिली. कौटुंबिक अडचणी, गृहकलह, महिला कामगार म्हणून संघटनेच्या व्यतिरिक्त मिळणारे कायदेशीर हक्क, सेवानिवृत्तीनंतर अपेक्षित निधी वा लाभ मिळावा यासाठी काय करता येईल यासह विविध प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन मिळावे म्हणून महिलांनी केंद्राची पायरी चढली. एका बलात्कारित महिलेने केंद्रात येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. मात्र या प्रक्रियेत महिला केवळ मार्गदर्शन घेण्यासाठीच येतात. प्रत्यक्ष न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येते, तेव्हा त्या माघारी फिरतात. त्यास संबंधित पीडित महिलांही अपवाद ठरली नाही. पाच वर्षांत या माध्यमातून केवळ एकच प्रकरण न्यायालयात दाखल होऊ शकले.
न्यायालयात किती प्रकरणे उभी राहू शकली, केंद्राला किती महिलांनी भेट दिली यापेक्षा महिला आपल्या हक्काविषयी जागरूक नाहीत. त्या भावनिक होत लगेच माघार घेतात, हा आजवरचा अनुभव असल्याचे केंद्र समन्वयक अ‍ॅड. वैशाली गुप्ते यांनी सांगितले. तसेच महिला वकील परिषदेलाही महिलांपर्यंत पोहोचण्यात काही तांत्रिक अडचणींसह काही अंतर्गत प्रश्न, जनजागृतीचा अभाव आदींना तोंड द्यावे लागत असल्याचे अ‍ॅड. गुप्ते यांनी सांगितले.