२ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि मुंबईत गौरव होणार

डॉ. नरेश गीते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून नाशिक जिल्हा सर्व योजनांमध्ये आघाडीवर असून जिल्ह्यास विविध पुरस्कार मिळाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत देशात सर्वाधिक ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल नाशिक जिल्ह्यास दोन ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पोषण आहार अभियानातही देशात जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याबाबत दोन ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचा गौरव करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गीते यांनी सर्व योजनांमध्ये नाशिक जिल्हा अव्वल राहील यासाठी मोठय़ा प्रमाणात कामकाज सुरू केले आहे. पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या पाठोपाठ आता जिल्ह्यास ‘स्वच्छ सर्वेक्षण पोषण आहार’ अभियानात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबवून स्वच्छतेविषयक काम करण्यात आले.

एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानातही नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर आहे.

दोन ऑक्टोबर रोजी शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाच्यावतीने पोषण आहार अभियानाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या एका प्रकल्पास आणि एका अंगणवाडी सेविकेसही सन्मानित करण्यात येणार आहे.

विविध उपक्रमांचे आयोजन

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्यत कुटुंब संपर्क अभियान राबवून घरांना भेट देण्यात आली. तसेच सरकारने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी अ‍ॅपद्वारे जिल्ह्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्ह्य़ाने दोन लाख २१ हजार ३२१ प्रतिक्रिया नोंदविल्या. तसेच स्वच्छता फेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, दुरुस्ती करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील भिंती रंगविण्यात येऊन सुशोभीकरण करण्यात आले.