पंचवटीतील पेठ नाक्यावर भक्तीधामसमोरील पादचारी मार्गावर झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाने द्राक्ष तोडणी मजुराचा भोसकून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित सुन्या उर्फ राहुल शिंदे यास अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गरमाळ येथील सुनील तुकाराम निकुळे (३६) हा जिल्ह्य़ात विविध ठिकाणी असलेल्या द्राक्षबागांमध्ये मजुरी करतो. रविवारी रात्री भक्तीधामशेजारील पादचारी मार्गावर सुनील झोपला असताना फुलेनगर येथील संशयित सुन्या उर्फ राहुल शिंदे हा झोपण्याच्या बहाण्याने तेथे आला. यावेळी राहुलचा निकुळे यांच्या पत्नीला धक्का लागला. त्यावरून निकुळेने जाब विचारला असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. राहुलने आपल्याजवळील धारदार शस्त्राने निकुळेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निकुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु कोणी येण्याआधीच संशयित फरार झाला. पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रेफिरवत शिंदेला अटक केली. भक्तीधाम परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.