नाशिक : जागतिक योग दिवस सोमवारी शहरात विविध उपक्रमांनी साजरा झाला. शहरातील योगा रुट्स संस्थेच्यावतीने सकाळी आयोजित १०८ सूर्यनमस्कार उपक्रमात ४० हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला. यात महिलांसह विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. करोनामुळे ऑनलाईन पध्दतीने हा कार्यक्रम झाला.
पूर्वतयारी न करता १०८ सूर्यनमस्कार घालणे अवघड असते. यासाठी संस्थेच्या प्रियंका साखरे, तेजस्विनी वझरे-लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिना सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले. महिनाभर केलेली तयारी फळास आली. सहभागींपैकी जवळपास निम्म्याहून अधिक सदस्यांनी १०८ सूर्यनमस्कार घातले. उर्वरित काही जणांनी १०५ चा टप्पा गाठला. प्रशिक्षणादरम्यान टप्प्याटप्प्याने वाढ करून सदस्यांची क्षमता वाढविली गेली.
सूर्यनमस्काराबरोबर सहभागींना प्रत्येक आसनात कोणती स्थिती घ्यायची, श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा, प्रत्येक आसनात कोणते चक्र सक्रिय होते, श्वसनावर नियंत्रण आदींवर मार्गदर्शन करण्यात आल्याचे साखरे यांनी सांगितले. धावपळीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ नसतो. अशावेळी सकाळी १२ सूर्यनमस्कार घातले तरी सर्व अवयवांना लाभ होतो. रक्ताभिसरण प्रक्रिया जलद होते. वेगवेगळ्या विकार जडलेल्या व्यक्तींनी कोणती आसने करावी, कुठली टाळावीत, याविषयी मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाशिवाय संस्थेच्यावतीने मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मखमलाबाद महाविद्यालय आणि अशोका शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांना योगाविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
‘केटीएचएम’मध्ये योगासने
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, केटीएचएम महाविद्यालयात सुरक्षित अंतराचे पालन करीत योग दिवस साजरा करण्या आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, योगशिक्षक जगदीश मोहुर्ले, क्रीडा प्रमुख प्रा. बी. बी. पेखळे, प्रा.अनिल भंडारे उपस्थित होते. प्राचार्य गायकवाड यांनी करोनाच्या संकटात योगाला अत्यंत महत्त्व असल्याचे नमूद केले. करोना हा फुफ्फुसाशी निगडीत आजार असून योगासने व प्राणायामाने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्वच रोगांवर योगासने व प्राणायाम उपयुक्त ठरतात. योगाचे महत्त्व जगाला पटले असून गेल्या वर्षभरात संपूर्ण जगभरात योग-प्राणायाम करणाऱ्यांची संख्या तीन ते चार पटीने वाढली आहे. योगशिक्षक जगदीश मोहुर्ले यांनी सर्वाकडून पूरक हालचाली, आसने, प्राणायाम, ध्यान या योगक्रिया करून घेतल्या तसेच प्राणायामचे महत्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन डॉ. बी. बी. पेखळे यांनी के ले. परिचय प्रा.अनिल भंडारे यांनी करून दिला.
भोसलात योग प्रात्यक्षिके
भोसला संस्थेतील मुलींच्या सैनिकी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. योग शिक्षिका स्वाती मुळे यांनी विद्यार्थिनींकडून ऑनलाईन पध्दतीने विविध आसनांच्या प्रकाराचे प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच प्रात्यक्षिकांद्वारे ध्यान, प्राणायाम यांचाही अभ्यास करून घेतला. रेखा कोठावदे यांनी योगाचे महत्व अधोरेखीत केले. योग दिनाचे औचित्य साधून १४ जूनपासून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे, मिलिंद वैद्य, वसुधा कुलकर्णी, प्राचार्या साक्षी भालेराव उपस्थित होते.