बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे साकारलेल्या १०८ फूट उंचीच्या भगवान ऋषभदेव यांच्या पूर्णाकृती मूर्तीने संपूर्ण जगाचे लक्ष या क्षेत्राकडे लागले आहे. हे ठिकाण धार्मिक तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. जैन धर्मियांचे पवित्र श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर भगवान ॠषभदेव यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना व महामस्ताभिषेक सोहळ्यासह अन्य धार्मिक विधींना गुरूवारी ध्वजारोहणाने सुरूवात झाली. शनिवारी या सोहळ्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा हजेरी लावणार आहेत.
मांगीतुंगी नगरीत देशभरातून जैनधर्मीय भाविकांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास ५० हजार भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचा अंदाज आहे. सप्ताहभर चालणाऱ्या सोहळ्यास ध्वजारोहणाने सुरूवात झाली. ऋषभदेवाच्या विशालकाय मूर्तीचे कार्य आश्चर्यकारक आहे. नाशिक जिल्ह्णाात अनेक तीर्थक्षेत्र असून त्यात मांगीतुंगीची भर पडली आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करून विकास कामे केली आहेत. पुढील काळात आणखी सुविधा देण्याकडे लक्ष दिले जाईल. या तीर्थक्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बडय़ा राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
लाखो भाविक सोहळ्यात सहभागी होणार असल्याने संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी परिसरात ६० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच भाविकांच्या वाहतुकीसाठी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील फाटय़ापासून १५० एसटी बसगाडय़ांचा ताफा सज्ज आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक, १०० पोलीस अधिकारी, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक कार्यरत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2016 रोजी प्रकाशित
मांगीतुंगी पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार – बागडे
मांगीतुंगी नगरीत देशभरातून जैनधर्मीय भाविकांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-02-2016 at 02:22 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds tallest statue of lord rishabhdeva consecrated at mangi tungi in nashik