‘व्हिडीओ गेम’ खेळण्यासाठी नेहमी येणारा मित्र. घरात येऊन तो कधी चोरी करेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण खेळण्यासाठी येणाऱ्या १४ वर्षीय मित्राने आपल्या मित्राच्याच घराची चावी नकळतपणे लंपास केली. संबंधित कुटुंबीय घरी नसताना मग तो अल्पवयीन सहकाऱ्याला घेऊन थेट त्या घरात शिरला.
सहा तोळे सोन्याचे दागिने, रोकड, टॅब व भ्रमणध्वनी असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन गायब झाला. मित्राच्या घरात चोरी करणाऱ्या दोघा अल्पवयीन संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी अटक करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या गुन्ह्याचा घटनाक्रम समोर आल्यानंतर खुद्द पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. इंदिरानगरमधील चार्वाक चौकात वंदना अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या संतोष वाटपाडे यांच्या घरात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चोरी झाली होती. त्यांच्या घराचे कुलूप कोणीतरी चावीने उघडून आत सहजपणे प्रवेश केला आणि लाकडी कपाटातील सहा तोळे सोन्याचे दागिने, एक हजार रुपये रोख, टॅब व भ्रमणध्वनी असे जे हाती लागेल ते लंपास केले. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करून पोलीस संशयितांचा शोध घेत होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. त्यावेळी इमारतीत कोण आले होते याची चौकशी पोलिसांनी आसपासच्या रहिवाशांकडे केली असता दोन मुलांची माहिती मिळाली. या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक प्रकार पुढे आला. एक संशयित हा वाटपाडे यांच्या मुलाचा मित्र आहे. दोघेही शाळकरी मित्र असून संशयित वाटपाडे यांच्या घरी व्हिडीओ गेम खेळण्यासाठी तो येत असे. त्यावेळी त्याने मित्राच्या घराची चावी चोरून घेतली.
कुटुंबीय घरी कधी नसतात याची माहिती मिळवली. चोरलेल्या चावीने घर उघडून संशयिताने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. या एकंदर प्रकाराने पोलीस अवाक झाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
मित्राच्या घरी अल्पवयीन मुलांकडून सव्वा लाखाची चोरी
सहा तोळे सोन्याचे दागिने, रोकड, टॅब व भ्रमणध्वनी असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन गायब झाला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 18-02-2016 at 00:21 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Younger children stolen million rupees