20 September 2020

News Flash

आईच्या ओढीने व्याकूळ बाळाचा घरात मृत्यू

रागाच्या भरात बाळाला घरी सोडून अल्पवयीन माता बेपत्ता

(संग्रहित छायाचित्र)

रागाच्या भरात बाळाला घरी सोडून अल्पवयीन माता बेपत्ता

नवी मुंबई : ११ महिन्यांच्या बाळास घरात एकटे सोडून त्याची आई निघून गेल्याने भुकेने त्या तान्ह्य़ा बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील करावे गावात नुकतीच उघड झाली. या बाळाची आई अल्पवयीन असून ती बाळासोबत आपल्या आईकडे राहात होती. आईशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात ती निघून गेली. बाळाची आजी सायंकाळी मोलमजुरी करून परतल्यानंतर तिला बाळ मृतावस्थेत आढळले.

मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेत वैरीण बनलेली आई अल्पवयीन असून ती पाच-सहा महिन्यांची गर्भवती असल्याचेही समजते. करावे गावात २७ जानेवारी रोजी ही घटना घडली. तेव्हापासून ही युवती घरी परतली नसून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

करावे गावातील एका चाळीत मर्जीना खातून ही पती आणि विवाहित मुलीसह राहते. खातूनच्या मुलीच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने त्याला कंटाळून ही मुलगी आपल्या ११ महिन्यांच्या बाळासह आईकडेच राहत होती. २५ जानेवारी रोजी खातून आणि तिचे भांडण झाले. त्याची धुसफूस घरात दोन दिवस सुरूच होती. २७ जानेवारी रोजी खातून ही मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर गेली असताना तिची मुलगी बाळाला घरात एकटे सोडून निघून गेली. सायंकाळी खातून ही घरी परतली असता तिला बाळ मृतावस्थेत आढळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांनी पथकासमवेत घटनास्थळी येऊन पाहणी केली. बाळाचा मृत्यू नेमका भुकेने झाला की आणखी कशाने हे अद्याप पूर्ण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात ‘मृत्यूचे कारण निश्चित सांगता येत नाही’, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता याबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात येत असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.

‘साब, काम पे जाऊ क्या?’

मूळचे पश्चिम बंगालचे असलेले खातून कुटुंब मोलमजुरीकरिता नवी मुंबईत आश्रयाला आले आहे. खातून, तिचा पती, मुलगी, जावई हे सर्व जण मोलमजुरी आणि धुणीभांडी करण्याचे काम करतात. खातूनचा पतीही दारूडा असून तो अनेक दिवसांपासून घरात आलेलाच नाही. जावयासही दारूचे व्यसन आहे. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खातून हिला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ‘साब, कामपे जाऊ क्या?’ असे तिने विचारताच पोलीसही हतबल झाले. हातावरचे पोट असल्याने तिला अडवायचे तरी कसे, या प्रश्नाने पोलिसांनाही निरुत्तर करून टाकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:08 am

Web Title: 11 month old baby die of starvation in navi mumbai
Next Stories
1 वाहन चोरटय़ांची नवीन शक्कल
2 लॉजमध्ये महिलेची हत्या करणाऱ्यास अटक
3 रेवस बंदराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी
Just Now!
X