वाढत्या शहरीकरणामुळे नवी मुंबई पालिकेच्या कामांचा व्याप दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी नोकरभरतीच्या आकृतिबंधाद्वारे साडेतीन हजार पदे भरण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ही मागणी टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्यातील अग्निशमन व वैद्यकीय या अत्यावश्यक सेवांसाठी येत्या महिन्याभरात एक हजार ७०३ पदांना शासन मंजुरी देण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पालिकेत दोन हजार ३३० कायमस्वरूपी व २७२ हंगामी कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. सुमारे चार हजार साफसफाई कंत्राटी कामगारांचा यात समावेश नाही.
ठाणे जिल्ह्य़ातील २९ ग्रामपंचायतींमधून थेट महानगरपालिकेत रूपांतरित झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या कामांचा विस्तार दिवसेदिवस वाढला असून कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यात स्मार्ट सिटीसारख्या केंद्र सरकारच्या योजनेत पालिकेची निवड झाली आहे. त्यामुळे भविष्यात कामाची व्याप्ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कायमस्वरूपी कामगारांवर जास्त खर्च होऊ नये म्हणून पालिकेने साफसफाई कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देताना मुंबईप्रमाणे कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा देणे टाळले आहे. त्यामुळे राज्यातील इतर पालिकांप्रमाणे आस्थापनावर होणारा भरमसाट खर्च नवी मुंबई पालिकेत होताना दिसत नाही. नवी मुंबई पालिका आस्थापनेवर केवळ १८ टक्के खर्च करीत असून नागरी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून नवी मुंबई पालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमनसारख्या अत्यावश्यक सेवांत कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्यमान व भविष्यात लागणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा एक नवीन प्रवेश सेवा-शर्तीचा आकृतिबंध तयार करण्यात आला असून, तो गतवर्षी मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याला टप्प्याटप्प्याने मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, मुख्य सचिव व पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यात झालेल्या एका बैठकीत यातील अत्यावश्यक पदांना लवकरच मंजुरी देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेचे ऐरोली, वाशी, नेरुळ, बेलापूर असे चार अग्निशमन दल सध्या कार्यरत आहेत. कोपखैरणे व नेरुळ टप्पा दोन असे दोन अग्निशमन दल प्रस्तावित आहेत. या जुन्या व प्रस्तावित अग्निशमन दलांसाठी पालिकेला ४९५ अग्निशमन दल जवान व अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळणार आहे. त्याचबरोबर पालिकेने करोडो रुपये खर्च करून बेलापूर, नेरुळ आणि ऐरोली येथे नव्याने रुग्णालये बांधली असून, वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातील परिचारिका व कक्ष साहाय्यकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे वैद्यकीय सेवेसाठी खूप मोठय़ा प्रमाणात कर्मचारी लागणार असून, यासाठी एक हजार २०८ पदांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पालिकेसाठी एकूण साडेतीन हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी टप्प्याटप्प्याने मान्य होण्याची शक्यता असून अग्निशमन व वैद्यकीय सेवेला यात प्राधान्य देण्याची शक्यता आहे. या दोन सेवांसाठी सध्या सुमारे १७०० कर्मचारी, अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.
जगन्नाथ सिन्नरकर,
उपायुक्त, नवी मुंबई पालिका