नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १६ हजार पार झाली आहे. शहरात आज २५३ नवे करोनाबधित आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १६ हजार ६७९ वर पोहचली आहे. शहरात आज  ३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४३७ झाली आहे.

शहरात आतापर्यत तब्बल ११  हजार ३६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३ हजार ६०५ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ करोना चाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत.पालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी नेरुळ येथे पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा तयार केली असून या प्रयोगशाळेला आयसीएमआरची  परवानगी मिळाली आहे.आजपासून शहरात पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू  झाली आहे.