बाधितांची संख्या वाढत असताना प्रशासनापुढे नवे संकट

नवी मुंबई : गेला आठवडाभर दिवसाला सरासरी ४०० करोनाबाधितांची असणारी संख्या पुढील काळात वाढणार असल्याने चिंतेत असलेल्या पालिका प्रशासनापुढे आणखी एक पेच निर्माण झाला आहे. करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापर्यंत दिवसरात्र काम करणारे करोनायोद्धेच (कर्मचारी, अधिकारी) आता करोनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ६० जण बाधित झाले आहेत तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात शहरात करोना नियंत्रित करताना पालिका प्रशासनाची कसरत होणार आहे.

टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबईत नागरिकांचा संचार वाढला असून अनेक जण मुखपट्टी, सुरक्षित अंतर, आणि सातत्याने हात धुणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिनाअखेर या शहरात पुन्हा करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चारशेपर्यंत रोखण्यात आलेली रुग्णसंख्या हा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांबरोबर प्रशासनही आजारी पडू लागले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना करोनाबाधितांचा शोध, तपासणी, उपचार या प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभांगातील अधिकारी, कर्मचारी हे मार्चपासून अथक मेहनत घेत आहेत.

एकही सुट्टी न घेता ते काम करीत असताना आता त्यांनाही करोनाने घेरले आहे.

मुळात पालिकेत ३ हजार ९३५ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात २ हजार ५१३ कर्मचाऱ्यांवर पालिका काम करीत आहे. मुळात कर्मचारी कमी असल्याचा ताण असताना आता अनेक अधिकारी व कर्मचाऱ्योनाही करोनाची लागण झाली आहे. काहींना जीवही गमवावा लागला आहे. ६० पेक्षा अधिक कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. काही सक्षम अधिकारीही करोनाबाधित आहेत. त्यामुळे आता कमी मनुष्यबळात या संकटाला सामोरे जावे लाग्णार असल्याची खंत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

अतिरिक्त आयुक्त वाशी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्यासह विविध उपायुक्त, विभाग अधिकारी व कर्मचारी असे अनेक करोनाबाधित झाले आहेत. पालिकेच्या एका विभाग कार्यालयातील १५ कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामामध्ये मोठी अडचण निर्माण होत आहेत.

अधिकारी व कर्मचारी अनेक महिने मेहनत घेत आहेत. अनेकांनी एकही सुट्टी घेतली नाही. काहींना जीवही गमवावा लागला आहे. परंतु कर्तव्यापासून दूर न जाता सर्वजण काम करीत आहेत. करोनाबाधित झाल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. परंतु नागरिकांनी आजार लपवू नये एवढे सहकार्य करावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका