पेपरच्या एक तास आधीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज

परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयाचा भलताच परिणाम पाहायला मिळत असून ऐन परीक्षेच्या आधी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी परीक्षेआधीच्या दोन दिवसांत अर्ज केले होते, तर यंदा बुधवारपासून सुरू झालेल्या परीक्षेच्या आदल्या दिवशी २६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्यांने पेपर सुरू होण्याच्या तासभर आधी अर्ज भरला. पण त्याचे परीक्षा केंद्र नालासोपारा येथील असल्याने मंडळाने त्याला वाशी येथील परीक्षा केंद्रावर पेपर देण्याची परवानगी दिली.

विद्यार्थ्यांच्या या विलंबामागे नेमकी कोणती कारणे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अशा ‘लेटलतिफ’ परीक्षार्थीची सोय करताना मंडळाच्या नाकीनऊ येत आहेत.

बारावीतील एकही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये म्हणून तीन वर्षांपूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज स्वीकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला. परंतु महिना-दोन महिने संधी देऊनही शेकडो विद्यार्थी आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. विलंबाने अर्ज दाखल करताना भरावे लागणारे चार ते पाच हजार रुपयांचे शुल्क भरण्याची तयारीही विद्यार्थी दर्शवत आहेत, हे विशेष!

नालासोपारा येथील बाहेरून बसलेला विद्यार्थी एजाज आलम याने बुधवारी परीक्षा सुरू होण्यास एक तास उरला असताना परीक्षेची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न झाल्याने एजाझ याला प्रवेशपत्र मिळाले नव्हते.

परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याच्या पालकांनी चौकशी केली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी एजाझच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नालासोपारा येथील परीक्षा केंद्र वेळेत गाठणे एजाझला अशक्य होते. म्हणून त्याला वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर तात्पुरती बसण्याची मुभा देण्यात आली, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.