पालिकेच्या डॅशबोर्डनुसार ३ हजार ०१५ खाटा शिल्लक; तरीही उपचारासाठी करोना रुग्णांची वणवण

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पालिका व खासगी रुग्णालयांतील मिळून ५ हजार ८७४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर यातील ३०१५ खाटा शिल्लक आहेत.

असे असताना खाटा मिळत नसल्याच्या करोना रुग्णांकडून तक्रारी होत आहेत.

नवी मुंबई शहरात  दिवसाला सरासरी ३५० ते ४०० रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ही ३२ हजारांपर्यंत गेली आहे. बाधितांची संख्या वाढत असली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील करोनामुक्तीचा दर या ८७ टक्के आहे. आतपरयत २८ हजार ८३९  बाधित करोनामुक्त झाले आहेत. प्रत्यक्षातच उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ हजार ९०९ पर्यंत आहे.

पालिकेने शहरात वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात १२०० खाटांचे करोना रुग्णालय उभारले आहे. तर शहरातील विविध ठिकाणी प्राणवायू व  साध्या खाटांची व्यवस्था केली आहे. खासगी रुग्णालयांतही खाटांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील ८० टक्के खाटा या शासकीय दराने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरात ५ हजार २५० खाटांचे नियोजन आहे. यापैकी ३ हजार०१५ खाटा या शिल्लक दिसत आहेत. असे असतानाही रुग्णांना खाटांच्या शोधात शहरभर फिरावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. अत्यवस्थ रुग्णांनाही अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणेअभावी उपचार मिळत नसल्याने शहराबाहेर जावे लागत आहे. खाटा शिल्लक असताना हा प्रकार का होत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा या शासकीय दरात उपलब्ध करून देण्याचे आदेश असताना रुग्ण या रुग्णालयात गेल्यानंतर खाटा शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.

अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या काही खाटा शिल्लक दिसल्या तरी त्या रुग्णालयातीलच अत्यवस्थ रुग्णांना दिल्या जातात. या खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. प्राणवायू असलेल्या खाटा मात्र शिल्लक आहेतच.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका