पनवेल परिसरात साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला. मात्र या निर्देशांचा भंग करणाऱ्या सहा मंडळांवर गणेशोत्सव झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. ही ६ मंडळे खांदेश्वर आणि खारघर वसाहतीमधील आहेत.
गणेशोत्सव साजरा करताना सामान्यांना त्रास होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश आखून दिले आहेत. पनवेल तालुक्यात सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये १२९ सार्वजनिक मंडळांनी तर २२४ गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी खांदेश्वर पोलीस ठाण्यातील दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सिडकोकडून परवानगी मिळविली नाही. तसेच खारघरमधील चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सिडकोने परवानगी दिली, परंतु या चारही मंडळांनी वाहतूक विभागाचे निकष धाब्यावर बसविल्याने ते अपात्र ठरले आहेत.
पोलीस विभागाने या सहा मंडळांच्या नावांच्या यादीसह या मंडळांनी उच्च न्यायालयाच्या निकषांच्या केलेल्या उल्लंघनाबाबतचा तपशील सिडको प्रशासनाला दिला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. सूर्यवंशी यांनी दिली. या मंडळांविरोधात प्रथम मुंबई पोलीस कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. त्यानंतर न्यायालयाचा अवमान केल्याचा अहवाल यांच्याविरोधात पोलीस विभाग पाठविणार आहे. खारघरच्या वसाहतीमधील चार मंडळांना सिडकोने निकष डावलून परवानगी दिल्याचे सिद्ध झाल्याने या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.