दिल्लीप्रमाणे व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात गेली अनेक वर्षे बकरी व्यवसाय थाटला असून यापासून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे.  तुर्भे स्टोअर आणि हनुमाननगरमध्ये या बेकऱ्या आहेत. दिल्लीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर नवी मुंबईतील बेकऱ्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या क्षेत्रातील एक बेकरी वगळता कोणत्याही बेकरी व्यावसायिकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. पालिकेने या बेकऱ्यांनाकेवळ व्यवसाय परवाना आणि अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यांची दरुगधी आणि अस्वच्छता येथील नागरिकांना अनेक वर्षे सतावत आहे. मात्र याची दाद मागावी कोणाकडे, हा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

नवी मुंबईतील औद्योगिक भागात तीस वर्षांपूर्वी मिळणारी स्वस्त जागा बघून मुंबईतील अनेक बेकरी व्यावसायिकांनी आपला मोर्चा तुर्भे स्टोअर, हनुमाननगर या भागात वळविला आहे. तुर्भे स्टोअरची संपूर्ण जमीन ही शासकीय जमीन असल्याने याची विक्री ही बेकायदा असताना तत्कालीन भूमाफियांनी या जमिनी मुंबईकर व्यावसायिकांना विकलेल्या आहेत. त्या ठिकाणी पत्र्याचे छप्पर बनवून हे व्यवसाय २० ते ३० वर्षांपूर्वी सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकवस्ती नंतर, मात्र व्यवसाय अगोदर असे चित्र असून यापसून होणारे प्रदूषण येथील रहिवाशांना बिनबोभाट सहन करावे लागत आहे.

हरित लवादाने दिल्लीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेकऱ्यांना टाळे टोकण्याचे आदेश दिलेले आहेत. नवी मुंबईच्या औद्योगिक वसाहतीतील झोपडपट्टी भागात १५ बेकरी व्यवसायआहेत. खारी, बिस्कीट, पाव हे त्यांचे उत्पादन असून शहरातील सर्व दुकानांत या उत्पादनांचे वितरण केले जात आहे. हा व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात धूर, अस्वच्छता व दर्प येत असतो.

पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या बेकरी व्यवसायांनी व्यवसाय परवाना व अग्निशमन दलाच्या परवानग्या घेतल्या असल्याचे आढळून आले आहे, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. माहिती अधिकारात ही माहिती मागविण्यात आली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या बेकऱ्यांची काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे समजते. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.